कोलगावातील निराधार वृद्धेला विशाल परब यांचा आधार

Edited by: विनायक गांवस
Published on: October 07, 2024 14:33 PM
views 213  views

सावंतवाडी : कोलगाव मारुती मंदिर नजीक येथील लक्ष्मी विठ्ठल दळवी (७२) या निराधार वृद्धेची करुण कहाणी भाजपा युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना समजताच त्यांनी या वृद्धेला तात्काळ २५ हजार रुपयाची मदत पाठवून दिली. त्यामुळे विशाल परब या संकटाच्यावेळी या निराधार वृद्धेचे आधार बनले. 

लक्ष्मी विठ्ठल दळवी या निराधार वृद्धेच्या पतीचे २५ वर्षांपूर्वी निधन झाल्यानंतर प्रतिकूल परिस्थितीत चंद्रशेखर आणि देवीदास या दोन्ही मुलांचा सांभाळ करत त्यांना शिक्षण दिले. मात्र मोठा मुलगा चंद्रशेखरच्या आकस्मित निधनानंतर आठ वर्षांपूर्वी लहान मुलगा देवीदास याचेही आकस्मित निधन झाले. चार महिन्यापूर्वी दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या या वृद्धेच्या घराचा प्रश्न त्यांच्या मुलांच्या वर्ग मित्रांसह दात्यांनी केलेल्या मदतीतून या घराच्या छप्पराची दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे या वृद्धेच्या निवाऱ्याचा प्रश्न मार्गी लागला. सध्या अनेक संकटांना सामोरे जात आणि परिस्थितीशी दोन हात करीत ही निराधार वृद्धा जीवन जगत आहे. उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही त्यात या वयात काम करणे तर सोडाच, धड चालता ही येत नाही अशी करूण कहाणी असल्यामुळे हाती पैसा नाही. त्यामुळे पुढे आपलं  काय होणार? या काळजीने या वृध्देची सध्या झोपच उडाली आहे. पर्यायाने आपल्याला कोणी मदत करेल का? या प्रतीक्षेत ही वृद्धा होती.

भाजपाचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या असहाय्य वृद्धेची माहिती मिळताच त्यानी आपले मित्र केतन आजगावकर यांच्याकडे या वृद्धेसाठी रोख २५ हजार रुपये पाठवून दिले. तसेच यापुढे मदत लागल्यास केव्हाही हाक मार अशा शब्दात या वृद्धेला धीर देण्यात आला. त्यामुळे या संकट समयी देवदूताप्रमाणे धाऊन आलेल्या विशाल परब यांचे या वृद्धेने आभार मानले.