
वेंगुर्ले : महाराष्ट्र राज्य कामगार पोलीस पाटील संघटना शाखा वेंगुर्ले आणि सावंतवाडी उपविभागीय पोलीस पाटील संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने, 'पोलीस पाटील दिना'चे औचित्य साधून रामघाट-अणसुर येथील सातेरी मंगल कार्यालयात भव्य स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला दोन्ही तालुक्यातील पोलीस पाटलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी आपला सामाजिक बांधिलकीचा वारसा जपत आर्थिक देणगी जाहीर केली होती. ही मदत पोलीस पाटील संघटनेकडे सुपूर्द करण्यात आली. भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना उर्फ बाळू देसाई आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुहास गवंडळकर यांच्या हस्ते ही देणगी वेंगुर्ले पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष मधुसूदन मेस्त्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी बोलताना मान्यवरांनी पोलीस पाटलांच्या ग्रामीण स्तरावरील कार्याचे कौतुक केले. गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटील हा महत्त्वाचा कणा असून, त्यांच्या अशा स्नेहमेळाव्यांमुळे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.










