
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब यांनी आपला वाढदिवस आरोस दांडेली येथील माऊली दिव्यांग कर्णबधिर निवासी विद्यालयात विद्यार्थ्यांना शिधा वाटप करून एका वेगळ्या आणि सेवाभावी पद्धतीने साजरा केला. या कृतीतून त्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले.
वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमात विशाल परब यांनी माऊली कर्णबधिर निवासी विद्यालयातील विद्यार्थ्यांशी त्यांच्या भाषेत मुक्त संवाद साधला. यावेळी त्यांनी केवळ शिधा वाटप केले नाही, तर विद्यालयाला भविष्यात आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा, मदत आणि सहकार्य करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि ते स्वतः कटीबध्द असल्याचे आश्वासन दिले. त्यांनी विद्यालयाला केवळ एक हाक द्या, आपल्यासाठी मी सदैव हजर आहे, असा विश्वास दिला.
वाढदिवसाच्या निमित्ताने विशाल परब यांनी माऊली दिव्यांग आणि कर्णबधिर मुलांच्या निवासी विद्यालयाला भेट दिली. मुलांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी या चिमुकल्यांनी स्वतः बनवलेल्या छोट्या वस्तू आणि चित्रे भेट म्हणून दिली. गेली जवळपास वीस वर्षे या मुलांसाठी निःस्वार्थपणे काम करणाऱ्या ८० वर्षांच्या गायकवाड आजींच्या सेवाकार्याचे विशाल परब यांनी मनापासून कौतुक केले. समाजातील अशाच आदर्शांवर आपण वाटचाल करत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गायकवाड आजींनी या कर्णबधिर आणि मतिमंद मुलांसाठी वयाच्या १८ व्या वर्षानंतर रोजगाराचे हक्काचे साधन मिळावे, यासाठी भविष्यात स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्र उभे करण्याची इच्छा व्यक्त केली. या केंद्राच्या उभारणीसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे वचन श्री. परब यांनी दिले.