अखेर विशाल परब अपक्ष लढणार

'मौन' ठरलं बंडाखोरीचे वादळ
Edited by: संदीप देसाई
Published on: October 24, 2024 12:44 PM
views 515  views

२८ ऑक्टोबरला अपक्ष उमेदवारी अर्ज करणार दाखल ;  भूमिका केली जाहीर 

ब्युरो : जसे जसे विधानसभा निवडणूक उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस मागे पडू लागलेत तसं तसा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम अधिक धगधगता होताना पाहायला मिळत आहे. बुधवारी अखेर विशाल परब यांनी आपलं मौन सोडत थेट सावंतवाडी विधानसभा मतदार संघात बंडखोरी करत २८ ऑक्टोबर ला अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. तर जिल्ह्यात उबाठाचे विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी विधानसभेसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर सावंतवाडी मतदार संघात इच्छुक आसलेल्या अर्चना घारे परब उद्या गुरुवारी कार्यकर्ता मेळावा घेऊन कोणती भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत अपेक्षित असताना सावंतवाडी मधील बंडखोरी जिल्ह्यातील निवडणुकीचे रंग बदलणार की काय असं चित्र निर्माण झालं आहे. 

 कणकवली विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार नितेश राणे यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झालेली असल्याने ते आता उमेदवारी कधी दाखल करतात याची तर महाविकास आघाडी उबाठाकडून कुणाला उमेदवारी जाहीर करते याची प्रतीक्षा कायम आहे. कुडाळात मात्र थेट आमदार वैभव नाईक यांना माजी खासदार निलेश राणे भिडणार आहेत. दोन तुल्यबळ व ताकदवार उमेदवार यांच्यात कुडाळ मध्ये सरळ लढत होणार असल्याने ही नाईक व राणे यांच्यासाठी जेवढी प्रतिष्टेची आहे त्याहीपेक्षा आता ही निवडणूक ठाकरे सेना विरुद्ध राणे आणि शिवसेना यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावणारी आहे.

कणकवली, कुडाळ व सावंतवाडी या तीन विधानसभा मतदार संघापैकी सर्वात जास्त इच्छुक उमेदवार  सावंतवाडीत असल्याने येथे काय होणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष कायम आहे. येथे मंत्री केसरकर व राजन तेली यांना दोन्ही शिवसनेकडून उमेदवारी जाहीर झाल्याने मुख्य लढत शिंदे विरुद्ध ठाकरे सेनेत अपेक्षित असली तरी. युवा नेतृत्व विशाल परब व महिला नेतृत्व अर्चना घारे हे दोन्ही उमेदवार सुद्धा तोडीस तोडच आहेत. यापैकी विशाल परब यांनी गुरुवारी मौन सोडत अपक्ष निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केल्याने आता उद्या शुक्रवारी अर्चना घारे परब काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

अखेर ते वृत्त खरे ठरले !

बुधवारच्या अंकात कोकणसादने सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचा लेखाजोगा मांडताना विशाल परब यांचं आताच मौन म्हणजे विधानसभा निवडणुका रणसंग्रमातील ही वादळापूर्वीची शांतता असं वृत्तांकन केलं होत. ते तंतोतंत खरं ठरलं. अखेर परब यांनी २८ ला अपक्ष उमेदवारी दाखल करत या रणसंग्रमात उतरण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला आहे. आता अर्चना घारे परब याही निवडणूकित उतरल्या तर सावंतवाडी विधानसभा रणसंग्राम अधिक रंगणार आहे. 

बंडखोरी कायम राहणार?

विशाल परब हे भाजपाचे युवा नेतृत्व. अलीकडेच त्यांनी भाजपाचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यांच्या वाढदिनी भव्य कार्यक्रम आयोजित करून आपली ताकद अधोरेखित केली होती. त्यामुळे भाजप विशाल परब यांच्या निर्णयावर काय ऍक्शन घेत. आणि परब त्यावर काय रियाक्शन देतात. हे पाहणे ही महत्वाचे असून याबाबतही मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार भाजपा ची वरिष्ठ मंडळी विशाल परब यांची समजूत काढण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र आता जाणसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतलेले परब नेमकी काय भूमिका घेतात हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिवस उलटल्या नंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या तरी परब यांच्या या भूमिकेने मतदार संघात वावटळ उठलं आहे.