
सावंतवाडी : अपक्ष उमेदवार विशाल परब यांच्या उमेदवारीशी भाजपचा कोणताही संबंध नाही. जर त्यांनी अर्ज मागे घेतला नाही तर त्यांची पक्षातून हकालपट्टी होईल, पक्षविरोधी भुमिकेमुळे कारवाई होईल अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केल्यानंतर ते बोलत होते.
ते म्हणाले, भाजपचे पदाधिकारी असणारे विशाल परब यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याचे काल संध्याकाळी निदर्शनास आले. भाजपच्या नेत्यांनी त्यांना उमेदवारी दाखल करू नका अशा सुचना दिल्या होत्या. भाजपात जो संघटनेचा आदेश मानतो त्याला चांगल भविष्य असतं. अजूनही चार दिवस आहेत. त्यांनी योग्य विचार करावा. त्यांनी अर्ज कायम ठेवल्यास भाजप व भाजप नेत्यांच नाव घेण्याचा कोणताही अधिकार त्यांना राहणार नाही. भाजप ही त्यागाची पार्टी आहे. ज्या देवेंद्र फडणवीस यांच नाव त्यांनी घेतलं त्यांनी देखील त्याग केला आहे. विशाल परब यांच्या उमेदवारीशी भाजपचा कोणताही संबंध नाही. जर अर्ज मागे घेतला नाही तर पक्षातून हकालपट्टी होईल पक्षविरोधी भुमिकेमुळे कारवाई होईल अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली.