सामाजिक कार्यक्रमांनी होणार वाढदिवस

Edited by: विनायक गांवस
Published on: October 13, 2025 22:34 PM
views 20  views

सावंतवाडी : भाजपचे युवा नेते आणि सामाजिक कार्यकर्ते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त १५ ऑक्टोबर २०२५ पासून विविध सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा आणि रोजगार विषयक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमांमध्ये सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुक्यातील गरजूंना मदत करणे, आरोग्य उपक्रम, तरुणांना प्रोत्साहन देण्यावर भर देण्यात आला आहे.

 वाढदिवसाचे औचित्य साधून १५ व १६ ऑक्टोबर २०२५ रोजी अनेक महत्त्वाचे सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यात देवाश्रय वृद्धाश्रम, मणेरी (दोडामार्ग) माऊली कर्णबधीर विद्यालय, कोंडूरे, जीवदान स्पेशल स्कूल, झाराप यांना धान्य वाटप करण्यात येणार आहे. शाळा दत्तक योजनेत सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांमधील गरजू मुलांना दत्तक घेऊन त्यांना आवश्यक ती मदत पुरवली जाईल.

आरोग्य सेवेत सर्व सरकारी हॉस्पिटल्समधील रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. यामध्ये १४ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ४ उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांचा समावेश आहे. तसेच क्षयरोग (टीबी) असलेल्या रुग्णांना दत्तक घेऊन त्यांच्या उपचारात आणि पोषणात मदत केली जाईल.

सावंतवाडी - २० रुग्ण, वेंगुर्ला - ३ रुग्ण, दोडामार्ग - ७ रुग्णांचा समावेश आहे. दिव्यांगाना शिधा वाटप होणार आहे. दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर वेंगुर्ला येथील साई मंगल कार्यालयात दिव्यांगांना शिधा (रेशन) वाटप करण्यात येणार आहे. तसेच महारक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

 कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देत युवकांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी आणि कोकणच्या सौंदर्याला जगासमोर आणण्यासाठी खास कलाविषयक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे: रील्स मेकिंग स्पर्धा 'रिलोत्सव २०२५' तसेच युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी दोन मोठ्या स्पर्धा आयोजित केल्या आहेत. भव्य खुली हॉलिबॉल स्पर्धा दिनांक १७ ऑक्टोबर व १८ ऑक्टोबर २०२५ जय मानसीश्वर मित्र मंडळ, वेंगुर्ला येथे होणार आहे. कबड्डी स्पर्धा २६ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडीत होत आहे. रोजगार आणि उद्योगाला चालना देण्यासाठी स्थानिक उद्योजक, बचत गट आणि तरुणांना स्वतःच्या नवसंकल्पना जगासमोर मांडता याव्यात यासाठी विशेष महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'Make IN कोकण' नवसंकल्पनांचा उत्सव १८ व १९ ऑक्टोबर २०२५ लोकल टू ग्लोबल - प्रदर्शन व विक्रीच आयोजन राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडीत करण्यात आलेय. विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात मोठ्या संख्येने नागरिक आणि तरुणांनी या उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.