
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील रणसंग्राम शिगेला पोहोचला आहे. त्यातच आज सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी विशाल परब यांना जमिनीच्या व्यवहारावरून जोरदार टार्गेट केलं आहे. याच जमीन व्यवहारा संदर्भातील एक व्हिडिओहि त्यांनी या पत्रकार परिषदेत सादर करून अशा अपप्रवृत्तीना त्यांच्या जागी पाठवा असे सांगत खळबळ उडवली आहे . मात्र, यावर विशाल परब समर्थकानीही मोठं धाडसी व तितकंच तोडीस तोड उत्तर दिलं आहे. 'योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो' असा स्टेस्टस ठेवत परब समर्थकांनी केसरकर यांच्या आरोपाना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.
विशाल परब यांची संयमी भूमिका अशा आरोपानंतर बदलेल असा अंदाज असताना, त्यांनी मात्र याबाबत अद्याप कोणतीही थेट प्रतिक्रिया याबाबत दिलेली नाही. मात्र त्यांच्या समर्थकांतून समाजमाध्यमांवर " योद्धा जेव्हा शरण येत नाही तेव्हा तो बदनाम केला जातो" अशी केलेली पोस्ट हे दीपक केसरकर यांना दिलेले उत्तर असल्याची चर्चाही यानिमित्ताने सुरू झाली आहे. सोमवारी २८ ऑक्टोबर ला विशाल परब या आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी केसरकर यांच्या आरोपांना ते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मिळालेल्या माहिती नुसार, विजयाची निर्णय क्षमता असलेल्या भाजपाला महायुतीत निवडणूक लढवता येणार नाही. हे स्पष्ट झाल्यानंतर भाजपा कार्यकर्ते अस्पष्ट झाले आहेत. साहजिकच विशाल परब यांची बंडखोरी अस्वस्थ भाजपा कार्यकर्त्यांच्या उद्रेकाचे प्रतिनिधित्व करू लागली आहे. विशाल परब कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यापासून माघार घेत नाहीत हे लक्षात आल्यानंतर महायुती व मंत्री व आमदार केसरकर ऍक्शन मोडवर येऊन विशाल परब यांना कोंडीत पकडणार हे उघड होते. त्यानुसार सावंतवाडी येथील पत्रकार परिषदेत दीपक केसरकर यांनी विशाल परब यांचे चुकीच्या पद्धतीने झालेल्या जमिनीच्या व्यवहार बाबत केलेले अनेक आरोप आणि त्याच्या पुष्टीकरणार्थ सादर केलेले व्हिडीओ, त्याच्या सत्यते बाबत शहानिशा व्हायला वेळ लागेल, परंतु त्यानिमित्ताने सावंतवाडी विधानसभा मतदार संघात मात्र यावेळी विधानसभा निवडणूक रणसंग्राम कमालीचा लक्षवेधी ठरणार एवढं मात्र नक्की आहे.