प्रश्न अनेक, उत्तर मात्र एकच...विशाल परब !

२८ ला उमेदवारी अर्ज भरणारचं.
Edited by: संदीप देसाई
Published on: October 26, 2024 18:53 PM
views 499  views

प्रश्न अनेक, उत्तर मात्र एकच.

सावंतवाडी : स्वप्न विकासाचं , सर्वांगीण प्रगतीचं , बेरोजगारी दूर करण्याचं, युवकांच्या उज्वल भविष्याचं,  महिलांच्या आत्मसन्मानाचं,आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचं, दर्जेदार शिक्षण व्यवस्थेचं, पर्यटनाला चालना देण्याचं...! प्रश्न अनेक उत्तर मात्र एकच विशाल परब. सोशल मीडियावर शनिवारी व्हायरल झालेल्या मॅसेजने विशाल परब यांच्या निवडणुक लढविण्याच्या निर्धाराला मोठं बळ मिळालं आहे. त्यात शनिवारी उशिरा त्यांनी आपला विजय निश्चित असून आपण २८ केवळ औपचारीकता म्हणून उमेदवारी दाखल करत असल्याचे श्री. परब यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय. 

 आपला हक्काचा माणूस विशाल परब अशी जनभावना असल्यानेच  लोकांच्या प्रश्नासाठी परब यांनी लोकशाहिच्या या पवित्र रणागणांत उतराव. स्वतःसाठी नव्हेतर आमच्यासाठी निवडणूक लढवावी अशी भावना समाज माध्यमातून व्यक्त होऊ लागल्याने विशाल परब २८ तारिखला कोणतं शक्तीप्रदर्शन करणार हे पाहणे आता उत्कंठेचं ठरणार आहे. इतकंच नव्हे तर भाजपा कार्यकर्त्यांच्या भावी पिढीचे प्रतिनिधित्व कारण्यासाठीही आपण मैदानात उतरत असल्याचे विशाल परब यांनी जाहीर केल्याने आता परब यांच्या भूमिकेबाबत औत्सुक्य अधिकच वाढले आहे. विशाल परब यांचा प्रत्येक कार्यक्रम लक्षवेधी असतो. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी अर्ज दाखल करणं हा तर त्यांच्या आणि त्यांच्या समर्थकासाठी फार मोठा टास्क असणार आहे. त्यामुळे साऱ्यांचेचं त्यांच्या भूमिकेकडे लक्ष कायम आहे. सध्या श्री. परब यांनी गावागावातून संपर्क दौरे सुरू केले आहेत. कार्यकर्ते व जनतेच्या ते गाठीभेटी घेत आहेत. तर महायुतीकडून जागावाटप निश्चित झाल्याने श्री. परब यांनी निवडणूक रिंगणात राहू नये, असे पक्षश्रेष्ठींकडून सांगण्यात आले . मात्र गेल्या काही वर्षांपासून तिन्ही तालुक्यातील घराघरात पोहोचलेले परब यांच्या पेक्षा त्यांच्यावर प्रेम करणारी युवाई आणि जनता हीच त्यांना ही उमेदवारी दाखल करण्यासाठी दबाव वाढवीत आहेत. आता पर्यंत त्यांनी राबविलेले अनेक सामाजिक, आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा अनेक समाजपयोगी उपक्रमांतून जनतेप्रती आपली असलेली बांधिलकी स्पष्ट केलीय. त्यामुळे आता त्यांना उमेदवारीसाठी होणाऱ्या आग्रहाच्या पार्श्वभूमीवर तसेच आता भाजपच्या कार्यकर्त्यांच्या भावी पिढीच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी आपला पुढाकार परब यांनी जाहीर केल्याने परब यांचं उमेदवारी दाखल करतांनाच शक्तिप्रदर्शन निश्चितच देखण्याजोगे असेल एवढे मात्र नक्की. 


भाजपा कार्यकर्त्यांच्या भावी पिढीचे प्रतिनिधित्व करण्यासाठीच मी मैदानात! - विशाल परब


महायुतीची गणिते साधण्यात भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मोठे नुकसान होत आहे. मागील पाच वर्षे सातत्याने रात्रंदिवस भारतीय जनता पार्टीची विविध अभियाने राबवणारे कार्यकर्ते आज संभ्रमित झाले आहेत. भारतीय जनता पार्टी शतप्रतिशत होण्यासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांवर महायुतीमुळे अन्याय होतो हे उघड दिसत आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे मजबूत अधिष्ठान असतानाही तिथे पार्टीचा उमेदवार का नाही?  दिल्या घेतल्या वचनांची गणिते जुळवताना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या पिढ्या उध्वस्त होणार असतील तर भाजपात नवीन पिढी घडेल का हा माझा प्रश्न आहे. महायुतीच्या हव्यासापोटी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विकासाची, आरोग्याची आणि युवकांच्या भवितव्याची स्वप्ने आमच्या नेत्यांनी खुडून टाकू नयेत, ही इथल्या तमाम कार्यकर्त्यांची भावना असून, पार्टीला याचा विचार निश्चितपणे करावाच लागणार आहे.


भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पद मिळाल्यानंतर मी पायाला चाके लावून रात्रंदिवस पक्षकार्यासाठी फिरलो आहे. स्वखर्चाने कितीतरी उपक्रम राबवले. माझ्यासोबतच  शेकडो कार्यकर्ते वेड्यासारखे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात कमळ फुलावे या आशेने झटले आहेत. आम्ही सर्वांनी आमच्या प्रामाणिक भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातल्या आहेत, त्या भावनांशी पक्षाचे नेतेही सहमत आहेत, केवळ महायुतीमुळे सर्वांचे हात बांधले गेले आहेत. महायुतीच्या धगीत भाजपाची मधली फळी अक्षरशः करपली असून ही परिस्थिती अशीच राहिली तर भाजपची अवस्था पुन्हा जनसंघासारखी होईल. 

 भाजपा कार्यकर्त्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि आज भाजपाला शतप्रतिशत बनवण्याची क्षमता असलेल्या , त्यासाठी रात्रंदिवस झटलेल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावी पिढीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी मैदानात उतरलो आहे. मी अपक्ष नाही तर पक्षाच्या कार्यकर्त्यांचा पक्ष मांडण्यासाठी उतरलो आहे. येणाऱ्या २३ नोव्हेंबरला भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांचा आवाज मतपेटीतून महाराष्ट्रासमोर उमटलेला दिसेल. या कार्यकर्त्यांच्या बळावर मला माझ्या विजयाचा विश्वास असून मी आजच तो विजय या सर्व कार्यकर्त्यांना आणि विकासासाठी परिवर्तन इच्छिणाऱ्या सावंतवाडी मतदार संघातील तमाम नागरिकांना तो समर्पित करतो. इतकंच नव्हे तर या विजयाची औपचारिकता म्हणून सोमवारी २८ ऑक्टोबरला आम्ही सर्वजण माझी उमेदवारी दाखल करत आहोत. आपल्या भावना महाराष्ट्रासमोर मांडण्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आणि नागरिक यावेळी किती मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, हे सर्वांना दिसून येतील, असा ठाम विश्वास भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष  विशाल परब यांनी व्यक्त केला आहे.