
सावंतवाडी : महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यातील महायुतीचे सरकार स्थापन करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला, असे असताना शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी ज्या पद्धतीने त्यांच्यावर टीका केली आहे ती निषेधार्ह असून यापुढे त्यांनी कोणतीही टीका केल्यास त्याचे तीव्र पडसाद उमटतील व जशास तसे उत्तर देण्यात येईल असा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी दिला. सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
भाजप हा सुसंस्कृत पक्ष असून संघ परिवाराच्या आशीर्वादाने चाललेला पक्ष आहे. या पक्षाचे पदाधिकारी कधीही पातळी सोडून बोलत नाहीत. असे असताना महायुतीची मोट बांधण्याचे काम ज्यांनी केले त्या रवींद्र चव्हाण यांच्यावर शिवसेना नेते रामदास कदम यांनी केलेली टीका अतिशय चुकीची असून त्यांना समज देण्यात यावी अन्यथा त्याचे दुरगामी परिणाम येथील शिवसेनेच्या लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकाऱ्यांना भोगावे लागतील असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे कोकणचे भाग्यविधाते आहेत. कोकणच्या विकासासाठी त्यांचे बहुमूल्य योगदान राहिले आहे. मुंबई गोवा महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे स्वतः रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. गणेशोत्सवापूर्वी हा महामार्ग चाकरमान्यांसाठी खुला व्हावा त्यासाठी ते जातीने लक्ष देत आहेत. रामदास कदम ज्या रायगड भागातून प्रतिनिधित्व करत होते त्या भागातील विकासासाठी ही रवींद्र चव्हाण यांचे मोलाचे योगदान राहिले आहे. त्यामुळे यापुढे त्यांनी कोणतेही भाष्य करताना काळजी घ्यावी नाहीतर आम्हालाही तशाच तसे उत्तर देता येते असेही त्यांनी सांगितले.
मी भाजपचा एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. येथील सर्वसामान्य व तळागाळातील जनतेच्या उत्कर्षासाठी व समृद्धीसाठी जेवढे काही करता येईल ते करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. येथील युवकांना रोजगार देण्यासाठी मी रोजगार महामेळावा घेऊन हजारो युवकांना रोजगार देण्याचा प्रयत्न केला. त्याचप्रमाणे इतर बाबतीतही येथील सर्वसामान्य जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा हेच माझे प्रयत्न आहेत. जनतेचे छोटे छोटे प्रश्न सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. पक्ष म्हणून आम्ही विविध पदावर कार्यरत असलो तरीही आम्ही सर्व एकच आहोत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, भाजपचे पदाधिकारी केतन आजगावकर, दिलीप भालेकर, अमित गवंडळकर, बंटी जामदार, नागेश जगताप आदी उपस्थित होते.