
दोडामार्ग : भर दिवसा लोकवस्तीत फिरणाऱ्या जंगली हत्तींनी शनिवारी मोर्लेवासीयांची झोप उडविली. बिनदिक्कतपणे गावात फिरणाऱ्या या हत्तीमुळे ग्रामस्थ दहशतीखाली आले.अखेर दुपारनंतर वनविभागाचे कर्मचारी , हाकारी टीम आणि गावकऱ्यांनी केलेल्या प्रयत्नानंतर हत्तींना जंगलाच्या दिशेने पिटाळण्यात यश आले. मात्र कोणत्याही क्षणी हा कळप पुन्हा माघारी परतेल या भीतीने मात्र गावकऱ्यांमध्ये दहशत मात्र कायम आहे. दरम्यान भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी मोर्ले गावाला भेट देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला. हत्तीप्रश्न सोडविण्यासाठी वरीष्ठ स्तरावर प्रयत्न केले जातील असे आश्वासन त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिले.
मोर्ले - केर परिसरात हत्तींच्या कळपाने अक्षरशः दहशत पसरविली आहे. माड , काजू ,पोफळी आदी फळझाडांच्या बागा नेस्तनाबूत केल्याने बागायतदार देशोधडीला लागला आहे. फक्त फळबागायतींवर ताव मारण्यापूरते मर्यादित असलेले हत्ती आता थेट लोकवस्तीत घुसून थेट घराच्या अंगणात येऊन पोहचले आहेत. लोकांचा पाठलाग करणे, त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणे, आणि स्वतःचा जीव वाचविण्याच्या नादात पडून गावकरी जखमी होण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. सध्या हा तीन हत्तींचा कळप मोर्ले गावात फिरत आहे.शनिवारी तर या कळपाने अक्षरशः गावकऱ्यांची झोपच उडविली. भल्या पहाटे मोर्ले त गजराज दाखल झाले आणि गावकऱ्यांची पळापळ सुरू झाली. भर लोकवस्तीतून हा कळप फिरू लागला.परिणामी हत्तींना पिटाळण्यासाठी ग्रामस्थांनी आरडाओरड सुरू केली. काहींनी तर हत्ती मुक्तपणे गावात फिरत असल्याचे मोबाईल च्या कॅमेऱ्यात कैदही केले. सकाळपासूनच हा थरार सुरू होता. अखेर वनविभागाचे कर्मचारी , हाकारी टीम व गावकऱ्यांच्या प्रयत्नानंतर या कळपाला जंगलाच्या दिशेने पिटाळण्यात यश आले.
हत्तींच्या दहशतीची माहिती मिळताच भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी तातडीने मोर्ले गावाला भेट दिली आणि गावकऱ्यांशी हत्तीप्रश्नावर संवाद साधला . गावकऱ्यांकडून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. आणि हा प्रश्न सोडविण्यासाठी आपण वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करू असे आश्वासन गावकऱ्यांना दिले. तसेच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांकडूनही सविस्तर माहिती घेतली.