कोकणात लोकसभा निवडणुकीचा हायहोल्टेज ड्रामा !

राणे VS राऊत खरी लढत ; रखरखत्या उन्हात प्रचारसभा
Edited by: संदीप देसाई
Published on: April 24, 2024 15:05 PM
views 213  views

सावंतवाडी : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात नेमके नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले असले तरी या मतदारसंघात महायुतीचे नारायण राणे विरुद्ध महाविकास आघाडीचे विनायक राऊत यांच्यातच खरी लढत पाहवयास मिळणार आहे. याच अनुषंगाने तर कोकणात लोकसभा निवडणूक रणांगण तापपल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. 


वंचित, बसपानेही आपले स्वातंत्र्य उमेदवार निवडणूक मैदानात उतरवले असून गमंत म्हणजे विनायक राऊत नावाने दोन उमेदवार या निवडणुकीत असल्याने त्याचा फटका महाविकास आघाडीचे उमेदवार आणि खा. राऊत यांना बसतो का, हेहि  ४ जूनला समजणार आहे. तर या लोकसभा मतदारसंघात नऊ उमेदवार रिंगणात असले तरीसुद्धा खरी लढत  महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी होते आहे. तरीही अन्य उमेदवार या दोन बलाढ्य शक्तीशी कशी लढत देतात, याकडेही रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील मतदारांचे लक्ष लागले आहे.


 महाविकास आघाडीच्या विनायक राऊत यांच्या विरोधात महायुतीकडून निवडणूक रिंगणात कोण उतरणार याबाबत लागलेली उत्कंठा महायुतीकडून नारायण राणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर संपुष्टात आली. आणि आता या मतदारसंघातील उमेदवारांनी निश्चित झाले असून खरी लढत महाविकास आघाडीकडून उबाटाचे  खासदार विनायक राऊत तर महायुतीकडून भाजपाचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आता खऱ्या अर्थाने प्रचाराचा जोरदार धुरळा उडू लागला आहे. लोकसभेच्या रिंगणात समोरासमोर नऊ उमेदवार उभे ठाकले आहेत. महाविकास आघाडीकडून शिवसेना नेते व खासदार विनायक भाऊराव राऊत, महायुतीकडून केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते नारायणराणे यांच्यासह अपक्ष म्हणून शकील सावंत, सैनिक समाज पार्टीचे सुरेश शिंदे, अपक्ष विनायक लवू राऊत, बसपचे राजेंद्र आयरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे मारुती जोशी, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक गंगाराम पवार आदी रिंगणात आहेत.

 महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून विनायक भाऊराव राऊत हे मशाल चिन्ह, महायुतीकडून भाजपचे उमेदवार म्हणून नारायण राणे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र लहू आयरे हे हत्ती, बहुजन मुक्ती पार्टीचे अशोक गंगाराम पवार यांचे निवडणूक चिन्ह खाट असून, वंचित बहुजन आघाडीचे मारुती रामचंद्र जोशी यांचे चिन्ह प्रेशर कुकर आहे. 

या मतदारसंघात विनायक राऊत नावाने दोन उमेदवार रिंगणात असून, महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठाचे राऊत यांचे चिन्ह मशाल, तर अपक्ष राऊत यांचे चिन्ह चिमणी आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला अपक्ष उमेदवार किती त्रासदायक ठरणार याबाबत मतदार संघात चांगलीच चर्चा रंगली आहे. सैनिक समाज  पार्टीचे सुरेश गोविंदराव शिंदे यांचे चिन्ह शिट्टी असून, अपक्ष अमृत अनंत तांबडे यांचे चिन्ह पेनाची निब सात किरणांसह आहे, तर अपक्ष उमेदवार विनायक लवू राऊत यांचे चिन्ह चिमणी असून, अपक्ष उमेदवार शकील सावंत यांचे चिन्ह माईक आहे.

 मात्र या साऱ्यात तळ कोकणात लोकसभेचा रणसंग्राम नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यातच रंगला आहे. केंद्रीय मंत्री असलेल्या नारायण राणे यांच्या प्रचारसाठी महायुतीकडून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रवींद्र चव्हाण, उदय सामंत, दीपक केसरकर, आमदार शेखर निकम, नितेश राणे, यांसह किरण सामंत, यांसह महायुतीतील मोठी फौंज कामाला लागली आहे.

तर हा विकास आघाडीचे उमेदवार  यांच्या प्रचारासाठी सुद्धा वरुण देसाई, अरुण दूधवडकर, माजी मंत्री प्रवीण भोसले, आमदार वैभव नाईक, राजन साळवी, अर्चना घारे, संजय पडते, संदेश पारकर, सतीश सावंत अतुल रावराणे, शैलेश परब, बाळा गावडे यांसह टिम कामाला लागली आहे. दोन्ही कडून प्रत्येक तालुक्यातील मोक्याच्या ठिकाणी उमेदवार व त्यांचे लीडर यांनी जाहिर प्रचार सभावर भर दिली आहे. विशेष म्हणजे प्रचारामध्ये जिल्ह्याच्या विकासात आपण काय योगदान दिले. आणि पुढील काळात काय करणार आहोत. हा अजेंडा मतदारांसमोर मांडणे सोडून एकमेकांची उणीधुणी काढणे, परस्पर विरोधी भ्रष्टाचाराचे आरोप करणे, एकमेकांवर टोकाची टिका करणे यातच सुरवातीला कलगीतुरा रंगला असल्याने पुढील प्रचाराच्या महत्वाच्या टप्प्यात कोकणात किती राजकीय शिमगा आणि निवडणुकीचा रणसंग्राम पेटतो हे पाहणे औस्तुक्याचे ठरणार आहे.