राणेंची स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्ह्यात राजकीय दहशतवाद !

विनायक राऊतांचा हल्लाबोल
Edited by: संदीप देसाई
Published on: April 24, 2024 14:55 PM
views 198  views

बांदा : भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी जिल्ह्यात राजकीय दहशतवाद निर्माण केला. मी दहा वर्षे खासदार राहिलो ते सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर संसदेत आवाज उठवायला. राणेंनी स्वार्थासाठी मणचेकर सारख्या निरपराध माणसाचा खून तसेच स्वतःच्या चुलत बंधू अंकुश राणे यांचा खुन केला. मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, बचतगट भवन राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी केले आणि हे मला दहा वर्षांत काय काम केले ते दाखवा असा सवाल करता मी काय काम केले ते जनतेला माहिती आहे. आडाळी एमआयडीसी मध्ये ५०० कारखाने येणार आणि रोजगार मिळणार असे सांगणारे राणे मात्र आपल्या माश्याच्या तेलाच्या कंपनीत मात्र बिहारचे कामगार ठेवतात त्यावेळी त्यांना सिंधुदुर्गची जनता आठवत नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी इन्सुली-कोनवाडा येथील सांस्कृतिक सभागृहात केली.

    इन्सुली जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उमेदवार राऊत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, शिवसेना जिल्हा समन्वयक बाळा गावडे, जिल्हाप्रमुख संजय पडते, मुंबई महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका वनिता इन्सुलकर, राष्ट्रवादी विधानसभा प्रमुख अर्चना घारे-परब, जान्हवी सावंत, काँग्रेसचे विकास सावंत, ऍड. दिलीप नार्वेकर, शिवसेनेचे विधानसभा प्रमुख शैलेश परब, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, मायकल डिसोझा, विवेक गवस आदी सह पदाधिकारी उपस्थित होते.

    यावेळी बोलताना खासदार विनायक राऊत पुढे म्हणाले, कोकणात पिकणाऱ्या काजूला परदेशात भरपूर मागणी असूनही त्याचा दर दरवर्षी कमी होत आहे. येथील आमदार दीपक केसरकर यांनी या काजूला १३५ रुपये भाव देण्याचे आश्वासन दिले होते, मात्र ते आश्वासन हवेत विरले. मात्र त्यांनी स्वतःसाठी अभिनेते जी व्हॅनिटी व्हॅन वापरतात ती २ कोटी रुपये किमतीची गाडी फिरायला आणली. त्यातूनच त्यांचा खोक्याचा प्रताप दिसतो. त्यावेळी त्यांना काजू, शेतकरी किंवा सर्वसामान्य जनता दिसत नाही. आपण संसदेत काजू आयातीवर वीस टक्के आयात कर लावण्याची मागणी केली होती, मात्र भाजप सरकारने ती फक्त पाच टक्के वर ठेवली आणि राज्य सरकारने अडीच टक्के केली. त्यामुळे दर्जाहीन काजू आयात करून आपल्या काजूची मागणी कमी करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे.

    राऊत पुढे म्हणाले, उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते तेव्हा आम्ही आमच्या जिल्ह्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज मंजूर करून आणले. उद्धवजीनी ताबडतोब ते मंजूर करून त्यासाठी निधी दिला. तर सावंतवाडीसाठी सुद्धा मल्टीस्पेशालिटी साठी निधी दिला, मात्र केसरकर यांच्या सावंतवाडी येथे करावे या हट्टापायी ते रखडले आहे. आम्ही वेत्ये येथे यासाठी आग्रही होतो मात्र त्यांनी त्याला सुद्धा विरोध केला. त्यामुळे आपल्या जनतेला गोवा येथे उपचारासाठी जावे लागते.

    यावेळी बोलताना जिल्हा समन्वयक बाळा गावडे म्हणाले, भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी इडी ला घाबरून शेपटी गुंडाळून भाजप मध्ये प्रवेश केला. त्यांनी अडीच वर्षे केंद्रात मंत्री राहुनही आपल्या जिल्ह्यातील जनतेचा विकास न करता फक्त आपला आणि आपल्या परिवाराचा विकास केला आहे. सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा वापर केला नाही. भाजपने इडीसह सर्व यंत्रणाच वापर करून अनेकांना आपल्या पक्षात घेतले मात्र आमचे पक्षप्रमुख उद्धवजी त्यांच्या धाकाला भीक न घालता महाराष्ट्रसाठी खंबीर उभे राहिले आहेत. त्यांच्या पाठीशी आपण उभे राहून खासदार निवडून दिला पाहिजे.

    यावेळी ग्रामपंचायत सदस्या सोनाली मेस्त्री, महिला उपतालुकाप्रमुख श्रावणी धुरी, संदीप कोठावळे, सुनील देसाई, आबा धुरी, तातो परब, मनोहर गावकर, संतोष मेस्त्री, कौस्तुभ गावडे, सुभाष गावकर, रियाज खान, मंथन गवस, न्हानू कानसे, रघुवीर देऊलकर, संजय पालव, विनोद गावंकर, रमेश गावकर, चंद्रकांत कासार, प्रदीप कोठावळे, आपा कोठावळे, सूर्यकांत गावडे, लावू गावडे, संदीप बोर्डेकर, शिल्पा पालव, स्मिता वागळे, मंथन गवस, उल्हास गावडे, अनिल आईर, विष्णू परब, पिंटो गावडे, गजानन गावकर, बाळू मेस्त्री, स्वप्नील नाईक, आबा धुरी, राजेश सावंत आदी सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सचिन पालव यांनी केले तर आभार कौस्तुभ गावडे यांनी मानले. यावेळी संजय पडते, विकास सावंत, प्रवीण भोसले, जानवी सावंत यांनी मनोगत व्यक्त केले.