उपकारकर्त्यांशी बेईमानी फार काळ टिकत नाही

कांदळगावकरांचे नाव न घेता राऊतांनी फटकारले
Edited by: कृष्णा ढोलम
Published on: June 15, 2024 15:06 PM
views 461  views

मालवण : उपकार कर्त्यांशी केलेली बेईमानी फार काळ टिकत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणाच्या पायाशी लोटांगण घालायचे आहे ते घाला असे सांगत माजी खासदार विनायक राऊत यांनी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांचे नाव न घेता फटकारले आहे.

मालवण शहरात शिवसेनेचे मताधिक्य घटण्यास खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक जबाबदार असल्याचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी म्हटले होते. त्याचबरोबर पालिकेच्या प्रशासकावरही कोणाचा अंकुश नसल्याचे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याचा आज मालवण दौऱ्यावर आलेल्या माजी खासदार विनायक राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. 

ते म्हणाले, आमदार वैभव नाईक यांनी मेहेरबानी केली नसती ही व्यक्ती नगराध्यक्ष बनली नसती. पाच वर्षांच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत शिवसेना पक्षाला त्यांनी किती प्रोटेक्ट केले ते सांगावे. उलट ठेकेदाराकडून पैसे मागत असल्याचा त्यांचा व्हिडीओही विरोधकांसह बऱ्याच जणांकडे आहे. स्वतःला हरिश्चंद्राचा अवतार समजायचा आणि दुसरीकडे फावड्याने ओरबडायचे ही त्यांची वृत्ती आहे. त्यामुळे त्यांनी ज्याच्या पायाशी लोटांगण घालायचे आहे ते घालावे. असे सांगतानाच येत्या सर्व निवडणुकांमध्ये इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी होण्यासाठी सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे स्पष्ट केले.