विनायक राऊतांनी श्री देव पाटेकराचं दर्शन घेत प्रचाराचा फोडला‌ नारळ !

केसरकरांच्या कृतघ्नता रक्तात !
Edited by: विनायक गांवस
Published on: April 20, 2024 11:10 AM
views 167  views

सावंतवाडी : पक्ष बदलूंना पालकमंत्री केलं,अर्थराज्यमंत्री केलं. आम्ही, उपाशी राहीलो. पण, तुम्हाला खायला घातलं. मात्र, खाल्लेल्या ताटात घाण केलेली ही अवलाद आहे. कृतघ्नता ज्यांच्या रक्तात आहे ते दीपक केसरकर असा जोरदार हल्लाबोल करत खासदार विनायक राऊत यांनी केसरकरांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. सावंतवाडी येथे श्री देव पाटेकराच दर्शन घेत त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला‌. यावेळी त्यांनी विरोधकांवर हल्ला चढविला. 


महाविकास आघाडी तथा इंडिया आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा शुभारंभ केला. ऐतिहासिक राजवाडा येथील श्री देव पाटेकर चरणी ते नतमस्तक झाले. राजघराण्याची त्यांनी भेट घेतली. संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना महायुतीच्या नेत्यांवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला.


ते म्हणाले,  प्रत्येक निवडणूकीत सावंतवाडी मतदारसंघात प्रचार करण्यापूर्वी राजघराण्यातील देव पाटेकराच दर्शन घेतो. मागच्या प्रत्येक निवडणुकीत ही परंपरा जपली आहे. त्याप्रमाणे आज देव पाटेकराच दर्शन घेतलं. भारतमातेच्या रक्षणासाठी आम्हाला ताकद दे व निवडणूकीत यश दे अशी प्रार्थना केली आहे असं मत खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केले. तर विरोधकांच्या टीकेला जास्त किंमत देत नाही. 'गिर गये तो भी टांग उपर' अशी त्यांची अवस्था आहे. पक्ष बदलूंना पालकमंत्री केलं,अर्थराज्यमंत्री केलं. आम्ही, उपाशी राहीलो पण, तुम्हाला खायला घातलं. मात्र, खाल्लेल्या ताटात घाण केलेली ही अवलाद आहे. आमच्यावर बोलायचा नैतिक अधिकार त्यांना नाही. सत्तेसाठी दीपक केसरकर किती लाचार होतात व कृतघ्न होतात हे अनेकदा दिसत. कृतघ्नता ज्यांच्या रक्तात आहे ते दीपक केसरकर असा टोला राऊतांनी हाणला. दरम्यान, कालच शक्ती प्रदर्शन हे आटापिटा करून गोळा केलेल होत. उन्हात तापणाऱ्या महिला शिव्या घालत होत्या‌. इंडिया आघाडीच विराट दर्शन व कालच केविलवाण दर्शन यातून आमचा विजय निश्चित झाला आहे‌. ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून  पदाधिकारी, कार्यकर्त्यांमुळे किमान अडीच लाखांच मताधिक्य मिळेल असा विश्वास खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केला.


याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, राष्ट्रवादीच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, जान्हवी सावंत, शिवसेना संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, अँड. दिलीप नार्वेकर, रूची राऊत, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, समीर वंजारी, बाळा गावडे, शब्बीर मणियार, रमेश गांवकर, शैलेश गवंडळकर, सावली पाटकर, सायली दुभाषी, देवेंद्र टेमकर, काशिनाथ दुभाषी, समिरा खलिल, आदी महाविकास आघाडीची पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.