शिवरायांच्या प्रतिमा विटंबनेविरोधात सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर कारवाई करा

विनायक राऊत यांची मागणी
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: August 26, 2024 12:40 PM
views 120  views

सिंधुदुर्गनगरी : हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची विटंबना ही शासन निर्मितीत असून, या दुर्घटनेत शिवरायांच्या अवमानास जबाबदार असणाऱ्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण व इतर अधिकाऱ्यांवर पोलीस फौजदारी कारवाई करावी अशी मागणी पंतप्रधानांकडे केली आहेत.


काही महिन्यांपूर्वी नेव्ही डे च्या निमित्ताने दि.०४ डिसेंबर २०२३ रोजी सर्जेकोट, तालुका मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण देशाचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. शिवरायांचे स्मारक उभारताना ज्या प्रतीकात्मक उपाययोजना करण्याची आवश्यकता होती, त्याकडे पूर्ण डोळे झाक करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर स्वतःचा टेंबा मिरविण्यासाठी ज्या घाई गडबडीने निकृष्ट दर्जाचे काम करून शिवरायांचा पुतळा उभा केला गेला,


करोडो - करोडो रुपयांची उधळपट्टी शिवरायांच्या नावावर करून ज्यांनी स्वतःची तुंबडी भरली आणि आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्ळ्याची जी दुरावस्था झाली त्याला सर्वस्वी जबाबदार महाराष्ट्र राज्याचे भ्रष्टाचारी सार्वजनिक बांधकाम खाते तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याविरुद्ध पोलीस फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अवमानाची जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री  रविंद्र चव्हाण यांनी ताबडतोब राजीनामा द्यावा.


 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती करण्यात येते की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान निसर्ग निर्मित किंवा इतर कोणत्याही कारणाने झालेला नसून तो महाराष्ट्र शासन निर्मितीतच आहे. सबब सर्व संबंधित अधिकाऱ्यांबरोबरच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांच्यावर पोलीस कारवाई करा आणि जेष्ठ तज्ञ मंडळींची समिती तयार करून या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण केंद्रीय गृहमंत्री यांना द्यावेत, अशी विनंती केली आहे.