
सिंधुदुर्गनगरी : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी अशी मागणी करणारे निवेदन माजी खासदार विनायक राऊत यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
रविवार ७ जुलै रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेले आहे. अतिवृष्टीमुळे बऱ्याच भागात मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबल्याने लोकांच्या घरात पाणी घुसले किंबहुना काही ठिकाणी घरेच पाण्याखाली गेलेली आहेत. काही ठिकाणी घरांवर झाडे पडून घरे उद्धवस्त झालेली आहेत. काही घरे, गुरांचे गोठे कोसळले असून नुकसानग्रस्तांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूसह सर्व सामान भिजल्याने त्यांच्यापुढे अत्यावश्यक सामान कपडे, अन्नधान्य ची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झालेली आहे. तसेच शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली जाऊन, शेती वाहून गेलेली असून शेतकऱ्यांची मोठी हानी झालेली आहे. काही बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी गेल्याने बाजारपेठा पाण्याखाली गेल्याने व्यापाऱ्यांचेही फार मोठे नुकसान झाले आहे. तरी वरील सर्व नुकसानीचे पंचनामे तात्काळ होऊन लवकरात लवकर सर्व संबंधित नुकसानग्रस्तांना भरीव मदत देण्यासाठी तत्काळ कार्यवाही करा अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.