शिवसैनिकांसह ग्रामस्थांनी देवगड निपाणी मार्ग रोखला

Edited by: नागेश दुखंडे
Published on: November 29, 2023 20:39 PM
views 305  views

देवगड :  देवगड तालुक्यातील शिरगाव चौकेवाडी प्राथमिक शाळेतील शिक्षकाच्या मागणीचा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे. वारंवार आश्वासन देणाऱ्या शिक्षण विभागाला जाग आणण्यासाठी ग्रामस्थांनी आज देवगड निपाणी मार्ग रोखला. शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा देत या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी शिक्षण मंत्री हाय हाय, या शिक्षणमंत्र्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशी घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला.

आठवडा बाजार असल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. यामुळे काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.शिरगाव चौकेवाडी शाळेत पहिली ते सातवी पर्यंत वर्ग आहेत. शाळेतील एक शिक्षक निवृत्त झाले. तर एका शिक्षकाला दुसऱ्या शाळेत कामगिरीवर पाठवले. सध्या शाळेत दोनच शिक्षक असून त्यातील एकाला शाळेचे कामकाज, सभा यासाठी नेहमी बाहेर जावे लागते. शाळेत सेमी इंग्लिश विषय असताना विद्यार्थ्यांना शिकवताना एकाच शिक्षकावर ताण येत असतो. यामुळे विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. कामगिरीवर काढलेल्या शिक्षकाला पुन्हा शाळेत रुजू करावे या मागणीसाठी चौकेवाडी शाळा व्यवस्थापन समितीने काही महिन्यांपूर्वी शाळा बंद आंदोलन पुकारले. यावेळी पवित्र पोर्टल मार्फत भरती झालेल्या शिक्षकामधून या शाळेला प्राधान्याने शिक्षक दिला जाईल तसेच या शाळेतील कामगिरीवर काढलेला शिक्षकाची नेमणूक रद्द करून पुन्हा याच शाळेत त्यांना पाठविण्यात येईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी श्रीरंग काळे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले होते. ३१ ऑगस्ट रोजी धोपटेवाडी शाळेतील शिक्षकाची पर्यायी व्यवस्था म्हणून चौकेवाडी शाळेत नियुक्ती करण्याचे लेखी आदेश गटशिक्षणाधिकारी यांनी दिले होते. मात्र अद्याप कार्यवाही झाली नसल्याने ग्रामस्थांनी पुन्हा बुधवारी आंदोलनाचे हत्यार उपसले.

यावेळी सरपंच समीर शिरगावकर, शिवसेना कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, उप तालुका प्रमुख रवींद्र जोगल, विक्रांत नाईक, यांच्यासह चौकेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनस्थळी मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अन्यथा मुले पंचायत समितीत बसवणारशिक्षकाच्या मागणी संदर्भात ५ डिसेंबर रोजी देवगड पंचायत समिती कार्यालयात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले असून यावेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन गटशिक्षणाधिकारी यांनी दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र चर्चेतून प्रश्न न सुटल्यास येथील दालनात विद्यार्थ्यांना बसवण्यात येईल आणि याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांत राणे यांनी दिला.