
सावंतवाडी : तालुक्यात ५२ ग्रामपंचायतीची रणधुमाळी सुरू असून ७ सरपंच बिनविरोध निवडून गेले आहेत. ४५ गावांत काटे की टक्कर होत असून भाजप- बाळासाहेबांची शिवसेना युती, कॉग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ग्रामपंचायतीत ताकद पणाला लावली आहे. यात तालुक्यात गेल्या काही वर्षांत बॅकफूटवर गेलेल्या राष्ट्रवादींनं कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांच्या नेतृत्वाखाली 'राष्ट्रवादी पुन्हा' चा नारा दिलाय. राष्ट्रवादीचे नेते माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांच गाव तिरोडे आणि नेतर्डे ग्रामपंचायत निवडणुकीत ग्राम पंचायत सदस्यपदी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तिरोड्याचा सदस्य सौ.दर्शना केतन मातोंडकर व सौ.सुचित्रा चंद्रकांत देसाई तसेच नेतर्डे गावच्या सदस्य सौ.लक्ष्मी उत्तम गवस यांची बिनविरोध निवड झाली असून अर्चना घारे-परब यांनी त्यांचं अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्यात.
अर्चना घारेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादींनं तालुक्यात गेल्या चार वर्षांपासून कामाला सुरुवात केली आहे. सावंतवाडी तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीत त्यांनी सरपंच व सदस्य पदासाठी मविआ मधून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केले आहेत. तर काही ठिकाणी स्वतःची पॅनल उभी केलीत. दोन ठिकाणी बिनविरोध सदस्यांच्या रूपानं राष्ट्रवादीनं तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एन्ट्री केली आहे. दरम्यान, तालुक्यात महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनेलचे सरपंच, सदस्य निवडून येतील. २० तारीखला येणाऱ्या निकालातून राष्ट्रवादी संपलेली नाही हे विरोधकांना दिसून येईल असं मत कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी व्यक्त केले आहे. यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, सावंतवाडी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, रत्नागिरी निरीक्षक दर्शना बाबर-देसाई यांसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.