गावचा सत्तासंघर्ष | धाकोऱ्यात दोन सख्ख्या बहिणींमध्ये लढत !

अपक्षही रिंगणात ; तिरंगी लढत चांगलीच रंगणार
Edited by: प्रा. रुपेश पाटील
Published on: December 15, 2022 17:57 PM
views 1017  views

सावंतवाडी : तालुक्यातील धाकोरे ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक यंदा भलतीच रंगतदार होत आहे. कारण सरपंचपदाच्या तिरंगी लढतीत दोन सख्ख्या बहिणींच्या अस्तित्वात तिसरा उमेदवार बाजी मारतो की काय? असे चित्र असल्यामुळे तुल्यबळ लढतीची रंगत जोर धरू पाहत आहे. 

धाकोरे ग्रामपंचायतच्या सरपंचपदाची निवडणूक अत्यंत रंगतदार अवस्थेत आहे. युवाशक्ती गाव विकास पॅनेल पुरस्कृत स्नेहा निलेश मुळीक या सरपंचपदाच्या उमेदवार असून त्यांचीच लहान भगिनी मुग्धा महेश रेडकर यादेखील सरपंचपदाच्या उमेदवार आहेत, तर तिसऱ्या अपक्ष उमेदवार संध्या मुळीक या आपले नशीब आजमावत आहेत.


स्नेहा मुळीक व मुग्धा रेडकर या दोन्ही भगिनींमध्ये अत्यंत तुल्यबळ लढत होत असून अपक्ष संध्या मुळीक यांनी चांगलेच तगडे आव्हान उभे केले आहे.

 दोन्ही भगिनींमध्ये कोण बाजी मारतो, की अपक्ष दोन्ही भगिनींना पुरून उरतो, हे नजीकचा काळच ठरवेल.


दरम्यान युवाशक्ती गाव विकास पॅनेल पुरस्कृत सरपंच पदाच्या उमेदवार स्नेहा निलेश मुळीक यांनी कोकणसादशी संवाद साधताना सांगितले की, गावातील ज्येष्ठ व युवा अशा दोन्ही स्तरावर मला पाठिंबा चांगला मिळाला आहे.  युवाशक्तीच्या जोरावर ग्रामविकास साधण्यासाठी मला जनता शंभर टक्के कौल देईल आणि मी सरपंच पदावर निवडूनच येणार, असा ठाम विश्वास स्नेहा मुळीक यांनी यावेळी व्यक्त केला आहे.


'आपली लहान बहीण आपल्या विरोधात निवडणूक लढवीत आहे या गोष्टीकडे कसे बघतात?' 

असा प्रश्न विचारल्यावर स्नेहा मुळीक म्हणाल्या, संविधानाने प्रत्येकाला निवडणुकीचा मूलभूत हक्क दिला आहे. माझी लहान बहीण जरी या निवडणुकीत निवडणूक लढत असली तरी माझ्या मनापासून तिलाही शुभेच्छा आहेत. शेवटी जनतेच्या मतावर सगळे काही अवलंबून आहे. जनमत हे माझ्या बाजूने आहे. म्हणून माझ्या लहान बहिणीचा पराभव पक्का आहे.  तरी भविष्यात तिच्यासुद्धा मला शुभेच्छा मिळतील, असा आशावाद स्नेहा मुळीक यांनी यावेळी व्यक्त केला.