विलास कुडतरकर यांचे पं. स. कार्यालयासमोर आमरण उपोषण

Edited by: विनायक गांवस
Published on: August 15, 2025 21:36 PM
views 24  views

सावंतवाडी : आरोंदा येथील रहिवासी विलास शंकर कुडतरकर यांनी १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या आजी, श्रीमती रुक्मिणी रघु नाईक यांच्या नावावरील घराचा वारसदार म्हणून त्यांचे नाव लावण्यात यावे, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

श्री. कुडतरकर म्हणाले, आपल्या आजीचे घर क्र. २१३ हे बेकायदेशीररित्या श्रीमती चंद्रभागा रावजी नाईक यांच्या नावावर लावण्यात आले आहे. याबद्दल वारंवार विनंती करूनही ग्रामपंचायत कोणतीही कारवाई करत नाही. रुक्मिणी रघु नाईक यांच्या कन्या श्रीमती पार्वती शंकर कुडतरकर आणि हेमलता नारायण गावडे यांच्या नावावर घरभाट सर्वे क्र. १७/९८ असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे ही मालमत्ता त्यांच्या कुटुंबाची असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ग्रामपंचायतीचे सरपंच यांनी या प्रकरणाला "न्यायप्रविष्ट विषय" असल्याचे सांगितले असले, तरी हे म्हणणे चुकीचे असल्याचा आरोप कुडतरकर यांनी केला आहे. कोर्ट दाव्याचा आणि घरपत्रक उताऱ्याचा काहीही संबंध नाही. तसेच, ग्रामपंचायत या प्रकरणात प्रतिवादी नाही.

या प्रकरणाची योग्य चौकशी करून रुक्मिणी रघु नाईक यांच्या वारसदारांची नावे ग्रामपंचायत अधिनियमानुसार घरपत्रक उताऱ्यावर नोंदवावीत, अशी मागणी विलास शंकर कुडतरकर यांनी केली आहे. जोपर्यंत या मागणीची पूर्तता होत नाही, तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.