
देवगड : देवगड तालुक्यात युनेस्कोचे अधिकारी 24 ऑक्टोबर 2024 रोजी विजयदुर्ग किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे निश्चित झाले आहे.महाराष्ट्रातील काही महत्वपूर्ण किल्ल्यांना युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अॅन्ड कल्चरल ऑर्गनायझेशन ( युनेस्को ) या जागतिक संघटनेचे वारसा स्थळासाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्यांचा समावेश आहे.
दरम्यान, यासंदर्भात युनेस्कोचे अधिकारी 24 ऑक्टोबर 2024 रोजी विजयदुर्ग किल्ल्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येणार असल्याचे निश्चित झाले आहे.विजयदुर्ग किल्ल्याला युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीमध्ये नामांकन मिळाल्याने विजयदुर्गवासीयांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, एलिफंटा लेण्या, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आदींसोबत विजयदुर्ग किल्ल्याचाही समावेश होईल असा विश्वास व्यक्त होत आहे. संबंधित संघटनेचे एखाद्या स्थळाचा जागतिक वारसा स्थळात समावेशा संदर्भात काही निकष असतात.167 देशांचा समावेश असलेल्या युनेस्कोच्या वारसा स्थळांमध्ये आजवर भारतातील 42 स्थळांचा समावेश असून या समावेशामुळे तेथील पर्यटनाला फार मोठी गती मिळाली आहे. सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र असे तीन विभाग या वारसास्थळामध्ये येतात. यापैकी आपल्या भारतात सांस्कृतिक विभागात 34, नैसर्गिक विभागात 7 आणि मिक्समध्ये 1 अशी 42 वारसास्थळांची नोंद झाली आहे. आता ज्या महाराष्ट्रातील काही महत्वपूर्ण किल्ल्यांना नामांकन मिळाली आहेत ही स्थळे मिश्र विभागात येत असून विजयदुर्ग किल्ल्याच्या समावेशासंदर्भात विजयदुर्गवासीयांना मोठं औत्स्युक्य आहे. दरम्यान, विजयदुर्ग किल्ला हा वर्षभर पर्यटकांसाठी खुला असतो. याचबरोबर या किल्ल्यातील ऐतिहासिक वास्तू मोठ्या प्रमाणात आपलं अस्तित्व टिकवून आहेत या बाबी ठळकपणे दिसून येतात.
विजयदुर्ग किल्ल्याच्या काही जमेच्या ठळक बाजूमुळे छत्रपतींचा व मराठी आरमाराने गाजवलेला घेरिया अर्थात विजयदुर्ग किल्ला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळात आपला ठसा उमटवेल असा विश्वास व्यक्त होत आहे. दरम्यान, काही न्यूज चॅनेलवर विजयदुर्ग किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळात समावेश झाल्याची बातमी प्रसारित करण्यात आली. मात्र 24 ऑक्टोबर रोजी संबंधित युनेस्कोचे अधिकारी यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यावरच कालांतराने या किल्ल्याचा समावेश होणार हे निश्चित होईल.आजही खलबतखाना,दारू कोठार, खूब लढा तोफा बारा सारखे बुरुज, सदरच्या मजबूत भिंती, घोड्याची पागा आदी वास्तू उभ्या आहेत. याचबरोबर या किल्ल्याचा धगधगता इतिहास, मराठा आरमाराची राजधानी आणि प्रथमदर्शनीच लांबून भुरळ पाडणारा हा किल्ला युनेस्कोच्या यादीत समाविष्ट होईल असा विश्वास व्यक्त होत आहे.
24 ऑक्टोबर रोजी प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जे अधिकारी वर्ग विजयदुर्गला भेट देणार आहेत, त्यांना किल्ल्याची माहिती देण्यासाठी किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समितीने पुढाकार घेतला असून इतिहास तज्ज्ञ डॉ. अमर आडके यांच्याकडून एका इतिहासप्रेमी महिलेला माहिती देऊन ही माहिती इंग्रजीमधून युनेस्कोच्या अधिकारी वर्गाला देण्यात येणार आहे.