
देवगड : देवगड विजयदुर्ग येथे १ जानेवारी रोजी 'एक पणती मावळ्यांसाठी, एक दिवा सैनिकांसाठी' या दीपोत्सवाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त सकाळपासूनच कार्यक्रमांची रेलचेल सुरू असणार आहे. विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ विजयदुर्ग गेली ४ वर्षे विजयदुर्ग किल्ला दीपोत्सव कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करीत आहे. यंदाही छत्रपती शिवराय, स्वराज्यांच्या मावळ्यांना व सैनिकांना मानवंदना देणार आहोत. या दीपोत्सव सोहळ्यात सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सोमवार १ जानेवारी रोजी दुपारी ३.३० वाजता विजयदुर्ग पंचक्रोशीतील विजयदुर्ग, रामेश्वर, गिर्येे या तीनही ग्रामपंचायत ग्रामस्थांसह पडेल, मोंड, नाडण, वाडा, वाघोटण, सडेवाघोटण, सौंदाळे, तिर्लोट येथील शिवप्रेमी मिळुन छत्रपती शिवरायांची पालखी मिरवणूक काढणार आहेत. ढोल-ताशांच्या गजरात ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरा जपत ५० मशाली, ५ हजार पणत्यासह भव्य-दिव्य विजयदुर्ग किल्ला दीपोत्सव कार्यक्रम साजरा होणार आहे.
एक ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा जपणारा दीपोत्सव साजरा करीत असताना याचे प्रमुख आकर्षण शिवकालीन युध्दकलेची आणि मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके, दिल्लीत सादरीकरण झालेले व संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक असलेले सव्यसाचि गुरुकुलम् कोल्हापूर, तसेच सागरी सीमा मंच कोकण प्रांतच्यावतीने शिवकालीन शिडाच्या बोटी दीपोत्सवच्या दिवशी किल्ले विजयदुर्ग येथे येऊन छत्रपती शिवराय, मावळे आणि सैनिकांना मानवंदना देत शिवकालीन आरमाराचे स्वरूप दाखविण्यात येणार आहे. तरी या सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन विजयदुर्गं ग्रामविकास मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे.