अखेर विजय रावराणे यांचे उपोषण स्थगित....

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: May 17, 2023 21:13 PM
views 170  views

वैभववाडी :

सडुरे प्राथमिक आरोग्य केंद्रात अत्यावश्यक सेवा उपलब्ध होण्यासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण स्थगित केले. या केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी  येथील बाह्य रूग्ण विभागात उपस्थित राहतील असे आश्वासन तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर चार गावातील सरपंच आणि ग्रामस्थांनी सुरू केलेले उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

विनामोबदला दिलेल्या जागेत प्राथमीक आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात यावी आणि सडुरे येथे सुरू असलेल्या केंद्रात अत्यावश्यक सेवा सुविधा उपलब्ध करून द्यावात या मागणी येथील तालुका आरोग्य कार्यालयाबाहेर सडुरेचे माजी सरपंच विजय रावराणे यांच्यासह निमअरूळे सरपंच सज्जन माईणकर,सडुरे सरपंच दिपक चव्हाण,अरूळे सरपंच मानसी रावराणे,कुर्ली सरपंच विजया पवार,नंदकुमार रावराणे,सुरेश बोडके,डी.के.सुतार,अंबाजी हुंबे,आप्पा सुतार,आदीनी उपोषण सुरू केले.या उपोषणकर्त्याशी दुपारी गटविकास अधिकारी जयप्रकाश परब यांनी चर्चा केली.त्यांनी इमारतीसंदर्भात शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील असे स्पष्ट केले.यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अनिल पवार,आरोग्य विस्तार अधिकारी आनंदा चव्हाण यांनी देखील उपोषणकर्त्याशी चर्चा केली.सडुरे प्राथमीक आरोग्य केंद्रांतील बाह्य रूग्ण विभागातच अत्यावश्यक सेवा देण्यासाठी वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतील असे लेखी आश्वासन श्री.पवार यांनी दिले.तसे लेखी पत्र त्यांनी उपोषणकर्त्याना दिल्यानंतर सकाळपासुन सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले.