
सावंतवाडी : प्रादेशिक हवामान विभाग मुंबई यांच्याकडून प्राप्त माहिती नुसार जिल्ह्यात 'रेड अलर्ट' हवामान विभागामार्फत देण्यात आलेला आहे. या कालावधीत मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दक्ष अधिकारी कर्तव्य निभावण्यासाठी मैदानात उतरले आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेषतः दोडामार्ग तिलारी, बांदा, ओटवणे तेरेखोल नदी अन् सावंतवाडीत आंबोली माडखोल सह्याद्रीपट्ट्या गेल्या काही वर्षांत अतिवृष्टीमुळे मोठा फटका बसत आहे. इतर ठिकाणी त्या तुलनेत कमीअधिक प्रमाणात नुकसानं होत. पऱंतु, दोडामार्ग तालुक्यात तिलारी धरण असल्यानं व डोंगराळ भाग अधिक असल्यान जास्त प्रमाणात फटका बसतो. धरण ओव्हर फ्लो झाल्यानंतर तिलारी नदीत पाणी सोडल्यानंतर दोडामार्गमधील काही गावांसह बांदा व परिसरातील भागात पुरस्थीती संभावते. मुसळधार पडणाऱ्या पावसान अनेकदा येथील ग्रामस्थांनी या आपत्कालीन परिस्थितीचा सामना केला आहे. असनिये, घारपी, झोळंबे, गाळेल, शिरशिंगे आदि भागात भुस्खलनासारखे प्रकार मागील काही वर्षांपासून अधिक वाढलेत. तर आंबोली घाटात दरड कोसळण्याचे प्रकार वाढल्यानं भितीच वातावरण निर्माण झाले आहे. नुकतीच रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीतील घटना व तेथील आक्रोशानं काळजाला झालेल्या जखमा ताज्या असताना अशी वेळ सिंधुदुर्गात येऊ नये यासाठी अधिकारी, कर्मचारी वर्ग मेहनत घेत आहेत. घटनास्थळी पाहणी करून अशा भागातील लोकांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरीत करत त्यांचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत आहेत. सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली उर्वरीत टीम रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून कार्यरत आहे. त्यामध्ये सीओ प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, प्रांताधिकारी सावंतवाडी प्रशांत पानवेकर,सावंतवाडी तहसिलदार श्रीधर पाटील, दोडामार्ग तहसिलदार अरूण खानोलकर, संकेत यमगर, वेंगुर्ला तहसिलदार ओंकार ओतारी, सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्लाचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, मुख्याधिकारी सावंतवाडी सागर साळुंखे, दोडामार्ग व वेंगुर्ल्याचे मुख्याधिकारी परितोष कंकाळ, सावंतवाडी पोलिस निरीक्षक ऋषीकेश अधिकारी, वेंगुर्ला पोलिस निरीक्षक अतुल जाधव, दोडामार्गचे जयेश ठाकुर, बांदा पोलिस अधिकारी श्यामराव काळे यांच्यासह गावातील ग्रामसेवक, तलाठी ते पोलिस पाटील, महावितरणचे जनमित्र वायरमन अधिकारी-कर्मचारी, सरपंच, लोकप्रतिनिधी सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते यांसह प्रत्येक जणचं प्रयत्नशील आहेत.
पऱंतु, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्यात जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना आणखीन बळ मिळण आवश्यक आहे. आपत्कालीन परिस्थितीत लागणारी साधनसामुग्री अधिक प्रमाणात उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. गेल्यावर्षी या भागात गोव्यातील एन.डी.आर.एफ, एस.डी.आर.एफची टीम मागवण्यात आली होती. यावेळी देखील जिल्हाधिकारी यांनी मागणी केल्यास तातडीनं राज्यसरकारच्या माध्यमातून गोव्यातून टीमची पूर्तता केली जाईल अशी माहिती शिक्षणमंत्री तथा माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. मात्र, सिंधुदुर्ग जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती या ठिकाणी घडणाऱ्या घटना पहाता सिंधुदुर्गसाठी NDRF, SDRF सारखी स्पेशल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्स उभी करणं आवश्यक आहे. गावाखेड्यात अशा प्रसंगी आपदा मित्र, सामाजिक संघटना, असंख्य युवक, बाबल आल्मेडांसारखी टीम प्रशासनाच्या मदतीसाठी नेहमी पुढे सरसावत असते. त्यामुळे अवघड क्लिष्ट प्रश्न सहज सोडवण्यात व बचावकार्यात यश येत. म्हणूनच, अशा तरूणांची नेमणूक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्पेशल डिजास्टर रिस्पॉन्स फोर्समध्ये करुन त्यांना योग्य ट्रेनिंग दिल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास अधिक बळ मिळेल.
जुन ते सप्टेंबर या कालावधीत विशेषत: कोकणात अशा जीवघेण्या प्रसंगांत मैदानात उतरणाऱ्या अधिकाऱ्यांंना आणखीन ताकद मिळेल. याचा विचार जिल्ह्यातील आमदार, खासदार व कॅबिनेट मंत्र्यांनी केल्यास आपत्कालीन परिस्थितीत निश्चितच अनेकांचे जीव वाचविण्यात प्रशासनाला यश येईल.