
चिपळूण : विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभान, सामाजिक जाण आणि स्थानिक संस्कृतीचा परिचय वाढावा या उद्देशाने विद्याभारती भारतीय शिक्षण संकुल, पंचकोश गुरुकुल-चिपळूण यांच्यातर्फे आयोजित ‘मातृभूमी परिचय शिबिर’ दिनांक २५ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबरदरम्यान ग्रामीण शिक्षण संस्थेच्या निवासी आश्रमशाळा, पडघे (जि. पालघर) येथे यशस्वीरित्या पार पडले.
शिबिराचे उद्घाटन ग्रामीण शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष नितीन वझे यांनी केले. उद्घाटन प्रसंगी पडघे ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल हाडळ आणि विद्याभारती कोकण प्रांताचे सहमंत्री विवेक पितळे उपस्थित होते.
सात दिवसांच्या या शिबिरात परिसर भेटी, श्रमसंस्कार, क्षेत्रभ्यास, आदिवासी घरांना भेट, लघुउद्योग परिचय, मुलाखती, बौद्धिक सत्रे, खेळ इत्यादी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. सातपाटी बंदर, जव्हार संस्थान, कर्णबधिर व मतिमंद मुलांची शाळा, अमूल व कॅमलिन कंपनी, शितलादेवी मंदिर, केळये किनारा, सातपाटी दीपगृह अशा महत्त्वपूर्ण स्थळांना विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या.
पालघर जिल्ह्याच्या भूगोल व इतिहास या विषयावर रवींद्र भुरकुंडे यांनी मार्गदर्शन केले. ‘पालघर जिल्ह्यातील सर्प’ या विषयावर सर्पमित्र प्रकाश (बंधू) चौधरी यांनी प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. वनवासी भागातील कार्याविषयी सामाजिक कार्यकर्ते भिकाजी राऊत यांचा व्यक्तिपरिचय आयोजित करण्यात आला. व्यंगचित्र आणि चित्रकला कार्यशाळा राष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार उमेश कवळे यांनी घेतली, तर ‘वारली चित्रकला’ शिकवण उद्योजक अंकुश अतकरी यांनी दिली. कथाकथन सत्रात रोहन अभ्यंकर यांनी क्रांतिकारक लाचित बरफुगन यांची कथा सादर केली.
‘संघशताब्दी आणि पंच परिवर्तन’ या विषयावर केतकी मुसळे, ‘नैसर्गिक संसाधनांचे शास्त्रीय महत्त्व’ या विषयावर आदित्य तांबे, तर ‘अखंड भारत’ या विषयावर पंकज भरवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शारीरिक व बौद्धिक खेळांचे नियोजन स्वयंसेवक अभिजीत गाडे यांनी केले.
जव्हार संस्थान, प्रगती प्रतिष्ठानचे कर्णबधिर विद्यालय, दिव्य विद्यालय, हुतात्मा काशिनाथ पागधरे स्मारक इत्यादी ठिकाणी विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन अभ्यासपूर्ण माहिती मिळवली. पडघे गावातील आदिवासी पाड्यांवर विद्यार्थ्यांनी संवाद साधत सामाजिक जाणिवेचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
शिबिराला पालघर जिल्ह्याचे संघचालक नरेश मराड, सहकार भारती अध्यक्षा पूर्वाताई सावंत, सातपाटी बाजार समितीचे योगेश पाटील, नितीन तरे, संशोधक भाऊ गावडे, प्रशांतदादा पाटील, उद्योजक प्रशांत पाटील, तसेच संस्थेचे संचालक भूषण आणि भाग्यश्री पाटील यांनी भेट देत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. समारोप सत्राला अनिल तरे व विवेक पितळे उपस्थित होते.
शिबिरात नऊ विद्यार्थी, अकरा विद्यार्थिनी, पाच शिक्षक अशा एकूण २५ जणांचा सहभाग होता. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रांतमंत्री संतोष भणगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक प्रसाद सनगरे, शिबिर पालक सिद्धीताई जाधव, शिबिर प्रमुख रोहन सिनकर, व्यवस्था प्रमुख सुश्रुत चितळे, अनुशासन प्रमुख आदित्य तांबे व संस्कार प्रमुख केतकी मुसळे यांनी विशेष मेहनत घेतली.










