दिल्लीतील घटनेचे सिंधुदुर्गात पडसाद !

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: December 21, 2023 12:04 PM
views 391  views

सिंधुदुर्गनगरी : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या व्यक्तिमत्त्वाची भ्रष्ट नक्कल तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी संसद आवारात केली होती. त्याचं चित्रीकरण खासदार राहुल गांधी यांनी केले होते. या सगळ्याचा निषेध भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या नेतृत्वाखाली वसंत स्मृती कार्यालय येथे करण्यात आला. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी संबंधित खासदारांना सभागृहात काम करण्याचा नैतिक अधिकार नसल्याने त्यांच सदस्यत्व रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे.

यावेळी इंडिया आघाडी विरोधात 'इंडिया आघाडी, शेम शेम जनता करेल तुमचा गेम,  मिमिक्री आर्टिस्ट हटाव संविधान बचाव, उपराष्ट्रपतीजी का अवमान नही रहेगा हिंदुस्तान, पदाची नाही जाण आहे ही वैचारिक घाण, लबाड लांडगा ढोंग करतय देशभक्तीच सोंग करतय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस रणजीत देसाई, राज्य कार्यकारणी सदस्य बंड्या सावंत, जिल्हाचिटणीस दीपलक्ष्मी पडते, मंडल अध्यक्ष दादा साईल, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सुप्रिया वालावलकर, रान बांबोळी सरपंच परशुराम परब, रांगना तुळसुली सरपंच नागेश आईर, राजा पडते, मोहन सावंत, पप्या तवटे,  निखिल कांदळगावकर, समर्थ राणे, शुभम राणे, सूर्यकांत नाईक, प्रकाश झेंडे, आदी उपस्थित होते.

राज्यसभेत विरोधकांनी संसद सुरक्षेच्या निमित्ताने प्रचंड गोंधळ घातल्याने कामकाज चालविणे अशक्य झाले होते. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष यांनी 50 हून अधिक खासदारांना अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित केले. यामुळे चिडलेल्या विरोधकांनी मंगळवारी संसदेच्या बाहेर मॉक पार्लमेंटचे आयोजन केले होते. त्यात कल्याण बॅनर्जी यांनी धनखड यांची भ्रष्ट नक्कल केली होती. तर राहुल गांधी यांनी याचे चित्रीकरण केले होते. यानंतर भारतीय जनता पक्षाच्या खासदारांनी एक तास उभे राहून आत्मक्लेष करून घेतला होता. याचे पडसाद सिंधुदुर्ग जिल्ह्यात उमटलेले पाहायला मिळत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत सिंधुदुर्गनगरी येथील वसंत स्मृती कार्यालय येथे विरोधी पक्षाच्या कृती विरोधात निषेध आंदोलन केले.