
दापोली : संरक्षण मंत्रालयाने दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापीठाचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांना आज कर्नल कमांडंट (एनसीसी) हे मानद पद आज झालेल्या एका कार्यक्रमात बहाल केले आहे. एनसीसीचे ग्रुप कमांडर ब्रिगेडीअर आर. के. पैठणकर व कराड येथील एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर सत्यशील बाबर यांनी या पदाच्या फिती डॉ. भावे यांच्या सैनिकी गणवेशाच्या शोल्डरवर लावल्या. या कार्यक्रमाला चिपळूणचे आ. शेखर निकम, दापोली अर्बन बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगावकर, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सावर्डेकर, सर्व संचालक, अधिकारी यावेळी उपस्थित होते.
कोकण कृषी विद्यापीठाच्या सेवेत दाखल झाल्यावर डॉ. संजय भावे यांनी 7 वर्षे एनसीसीचे सहयोगी राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी यापदी काम केले होते, तसेच कोकण कृषी विद्यापीठ येथे राष्ट्रीय छात्र सेनेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी सहभागी होतील यासाठी पुढाकार घेतला. त्यांच्या या कार्याची दखल देशाच्या संरक्षण मंत्रालयाने घेऊन त्यांना जोपर्यंत ते विद्यापीठाच्या कुलगुरू पदावर कार्यरत असतील तोपर्यंत त्यांना मानद कर्नल कमांडंट हे पद बहाल केले आहे. डॉ. संजय भावे यांचे अभिनंदन करण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अनेक मान्यवर आज उपस्थित होते.