
सावंतवाडी : कोकण म्हटले की अनेकांच्या मनात येते ते सह्याद्रीच्या कुशीत फेसाळणारे पांढरे शुभ्र धबधबे आणि रत्नागिरी रायगड आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला लाभलेला निळा शार समुद्र. मात्र एवढीच कोकणची मर्यादित पर्यटन ओळख नाही तर येथील जागृत देवस्थाने भव्य दिव्य मंदिरे आणि येथे आल्यानंतर भाविक भक्तांना नवसाला पावणारे देव हीसुद्धा अलीकडे कोकणाची अध्यात्मिक पर्यटन म्हणून ओळख होत आहे. अशीच ओळख आजगाव येथील जागृत देवस्थान असलेल्या श्री देव अग्निवेताळ मंदिराची आहे.
सिनेसृष्टीतील विशेषतः आध्यात्मिक मालिकांमध्ये दिग्गज अभिनेता म्हणून ज्यांनी आपल्या अभिनय अभिनयाचा ठसा उमटविला, रामायण, महाभारत, श्रीकृष्णा, लव-कुश अशा आध्यात्मिक मालिकांमधून ज्यांनी श्री देव महादेव तसेच महर्षी वाल्मिकी अशा विविध रंगी व्यक्तिरेखा साकारल्या, एवढेच नव्हे तर सलमा, फुल, खुनी शिकंजा, एक और खून, कलिंगा अशा अनेक हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयातून रसिकांचे भरभरून मनोरंजन केले, ते दिग्गज अभिनेते विजय काविश गुरुवारी आजगाव येथील जागृत देवस्थान श्री देव अग्नि वेताळच्या वार्षिक उत्सवात उपस्थित होते. यादरम्यान कोकणसादचे उपसंपादक प्रा. रूपेश पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधला.