
अश्वमेध तुळस महोत्सवाची मंगलमय सांगता
सांस्कृतिक वारशाचे संवर्धन हाच महोत्सवाचा ध्यास
वेंगुर्ले : कोकणच्या सांस्कृतिक पटलावर आपल्या कार्यकर्तृत्वाचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अग्रणी संस्था 'वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस' आयोजित 'अश्वमेध तुळस महोत्सव २०२६' या पंचदश दिवसीय कलाविष्काराची सांगता नुकतीच अत्यंत दिमाखदार सोहळ्यात संपन्न झाली. कला, क्रीडा आणि संस्कृतीचा अनुपम संगम असलेल्या या महोत्सवाचा सांगता समारंभ नामवंत सामाजिक कार्यकर्त्या वेदिका विशाल परब यांच्या शुभहस्ते व प्रमुख उपस्थितीत पार पडला.
समारोप कार्यक्रमाचा प्रारंभ वेदिका विशाल परब यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमापूजनाने झाला. यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ उद्योजक दादासाहेब परुळकर, उद्योजक पुष्कराज कोले, कोकण कला व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल, तुळस गावच्या सरपंच रश्मी परब, खर्डेकर महाविद्यालय वेंगुर्ला चे प्राचार्य डॉ धनराज गोस्वामी, माजी पं.स.सभापती यशवंत परब, उपसरपंच सचिन नाईक, सामाजिक कार्यकर्ते निलेश नागवेकर, सुजाता पडवळ आणि वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर यांसह परिसरातील विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संस्कृतीचे रक्षण हीच काळाची पाऊलखूण : वेदिका परब
याप्रसंगी आपल्या ओघवत्या वाणीतून मार्गदर्शन करताना वेदिका विशाल परब यांनी वेताळ प्रतिष्ठानच्या ध्येयधोरणांचे मुक्तकंठाने कौतुक केले. त्या म्हणाल्या, "आजच्या या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात आपली मूळ लोकसंस्कृती आणि गौरवशाली परंपरांचे जतन करणे ही एक मोठी आव्हानात्मक जबाबदारी आहे. वेताळ प्रतिष्ठानने ग्रामीण भागातील सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देऊन नव्या पिढीमध्ये संस्कारक्षम जाणीव निर्माण केली आहे. अशा महोत्सवांमुळे केवळ मनोरंजनाचे साधन न ठरता, समाजाला एक नवी दिशा आणि सांस्कृतिक वारशाचे अक्षय पाथेय मिळते." ‘अश्वमेध’चा हा ज्ञान-कला यज्ञ असाच अखंड तेवत राहो, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली. उद्योजक पुष्कराज कोले यांनीही प्रतिष्ठानच्या शिस्तबद्ध आयोजनाचे आणि नियोजनाचे विशेष कौतुक केले.
महोत्सवाच्या पंधरवड्यात विविध ३५ हून अधिक स्पर्धांनी तुळस परिसर दुमदुमून गेला होता. या महोत्सवाचे विशेष आकर्षण म्हणजे सलग तीन दिवस रंगलेला 'दशावतार नाट्य महोत्सव' होय. कोकणची वैभवशाली लोककला असलेल्या दशावताराचे उत्कट सादरीकरण पाहण्यासाठी रसिक प्रेक्षकांनी अलोट गर्दी केली होती. याव्यतिरिक्त चिमुकल्यांसाठी रंगभरण व चित्रकला, आध्यात्मिक अधिष्ठानासाठी आरती गायन व स्तोत्र पाठांतर, तर विचारांना धार देणारी वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. शालेय स्तरावर समूह गीत गायन, प्रश्न मंजुषा, अभिनय स्पर्धा आणि सोलो डान्स अशा वैविध्यपूर्ण स्पर्धांनी महोत्सवात रंगत आणली. प्राथमिक शाळांसाठीची समूह नृत्य स्पर्धा, खुल्या गटातील ग्रूप डान्स, नात्यांच्या वीणेला गुंफणारी 'नात्यातील जोडी नृत्य स्पर्धा' आणि शारीरिक सुदृढतेसाठी झालेली 'दौड' स्पर्धा ही प्रेक्षकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.
कृतज्ञता सन्मान आणि मानपत्र अर्पण
महोत्सवाचे औचित्य साधून सामाजिक आणि सांस्कृतिक, पत्रकारिता क्षेत्रांत ऋषितुल्य कार्य करणाऱ्या दिग्गजांचा 'मानपत्र', शाल,श्रीफळ देऊन यथोचित गौरव करण्यात आला. यामध्ये नाटककार अशोक तेंडुलकर, रांगोळीकार रमेश नरसुले, पत्रकार महेंद्र मातोंडकर, कथाकार प्रदीप केळुसकर, ज्येष्ठ दशावतार कलाकार महेश गवंडे आणि आदर्श शिक्षक तेजस बादिवडेकर यांचा समावेश होता.
समारोप प्रसंगी महोत्सवांतर्गत झालेल्या खुल्या नृत्य स्पर्धेचे निकाल खालीलप्रमाणे राहिले:
नात्यातील जोडी नृत्य स्पर्धा
प्रथम क्रमांक: दिशम व गंश परब
द्वितीय क्रमांक: ज्ञानेश्वरी व दिव्या ठुंबरे
तृतीय क्रमांक: संजीवनी व सानिका पांगम
उत्तेजनार्थ प्रथम: तेजश्री व सार्थक लांजेकर
उत्तेजनार्थ द्वितीय: आरोही व यशस्वी कुंभार
समूह नृत्य स्पर्धा (खुला गट)
प्रथम क्रमांक: एस. आर. बी. ग्रुप (देवगड)
द्वितीय क्रमांक: श्री शिवाजी हायस्कूल (तुळस)
तृतीय क्रमांक: जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा, वेंगुर्ला नं. ०१
उत्तेजनार्थ प्रथम : जय हिंद विद्यालय (फासतळी-तुळस)
उत्तेजनार्थ द्वितीय:रेडी गावतळे मोरया ग्रुप.
या स्पर्धांचे परीक्षण नागेश नाईक आणि महेंद्र मातोंडकर यांनी चोखपणे पार पाडले. कार्यक्रमाचेसूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले, तर उपस्थितांचे ऋणनिर्देश बी. टी. खडपकर यांनी व्यक्त केले. महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी वेताळ प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले.










