अत्यंत महत्वाचे | 'तुतारी' 50 मिनिटे उशिरा सुटूनही पोहोचणार वेळेत !

नवे वेळापत्रक 7 एप्रिलपासून
Edited by: प्रतिनिधी
Published on: April 03, 2023 08:44 AM
views 1680  views

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी ते मध्य रेल्वेच्या दादर जंक्शन दरम्यान चालवण्यात येणारी तुतारी एक्सप्रेस अप दिशेने धावताना सायंकाळी ७ वाजून १० मिनिटांऐवजी रात्री ८ वाजता सुटणार आहे. या गाडीची मुंबईतील दादरला पोहोचण्याची वेळ मात्र पूर्वीप्रमाणे राहणार आहे. कोकणकन्या एक्सप्रेस पाठोपाठ आता याही एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सावंतवाडी ते दादर मार्गावर धावताना ही गाडी 50 मिनिटे उशिरा सुटूनही ती मुंबईत दादरला नेहमीप्रमाणेच पोचणार आहे. तुतारी एक्सप्रेसला हा बदल ७ एप्रिलपासून लागू होणार आहे.

सावंतवाडी रोड स्थानकातून सुटणारी गाडी क्र. ११००४ दादर सावंतवाडी रोड अर्थात तुतारी एक्स्प्रेसच्या वेळेत दि.७ एप्रिल २०२३ पासून बदल करण्यास कोकण रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली असल्याची माहिती कोकण रेल्वेकडून प्राप्त झाली आहे आहे. 

अप दिशेने धावणाऱ्या तुतारी एक्सप्रेसच्या वेळापत्रकातील बदलामुळे सावंतवाडी ते वीर दरम्यानच्या स्थानकांवरील वेळेत काहीसा फरक झाला आहे. दरम्यान सावंतवाडी येथून ही गाडी सध्याच्या तुलनेत 50 मिनिटे उशिरा सुटली तरी वेळ कव्हर करीत वीर- माणगावपासून पुढे दादरच्या दिशेने धावताना ती आधीच्या वेळापत्रकानुसार धावणार आहे. या बदलामुळे प्रवाशांना सावंतवाडी ते खेड या दरम्यानच बदललेली वेळ लक्षात ठेवावी लागणार आहे.

दादर ते सावंतवाडी या दरम्यान धावणाऱ्या गाडीच्या (11003) वेळापत्रकात कोणताही बदल झाला नसल्याचे कोकण रेल्वेकडून कळवण्यात आले आहे.