
दोडामार्ग : कसई - दोडामार्ग नगरपंचायतच्या विकास आराखड्यावरून नगरपंचायत विशेष सभेत नगराध्यक्ष चेतन चव्हाण व नगरसेवक संतोष नानचे यांच्यात शाब्दिक बाचाबाची होऊन काही वेळ सभेत गदारोळ झाला.
अध्यक्ष चेतन चव्हाण यांनी सुरुवातीला विकास आराखडा नागरिकांच्या हिता विरोधात असल्याने सर्व नगरसेवकांनी त्याला नामंजुरी द्यावी अशी सूचना दिल्यावर, नगरसेवक संतोष नानचे यांनी शहर विकास आराखडा करताना आम्ही नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही त्याचवेळी विरोध केला होता. मात्र यावेळी तस नगराध्यक्ष यांनी केले नाही. मात्र आता नामंजूर करण्यासाठी त्यांना शहाणपण सुचलं आहे. याच मी अभिनंदन करतो असे नानचे म्हणाले.
यावेळी चव्हाण म्हणाले की, नगरसेवक नानचे यांना विकास आराखड्याबद्दल काहीही अभ्यास नाही. त्यांनी अभ्यास करून मगच सभागृहात बोलावे, विरोधाला विरोध करण्यासाठी, आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण करु नये. त्यांची या सभागृहात बसण्याची लायकी नाही अशा शब्दांत चव्हाण सुनावले.
यावेळी विशेष सभा नगरसेवक संतोष नानचे, रामचंद्र ठाकूर, पांडुरंग बोर्डेकर सोनल म्हावळणकर यांनी सभा त्याग केली. व सभागृहाच्या बाहेर गेले.