वेंगुर्लेतील सर्वात मोठा वनराई बंधारा पक्का करण्यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच्या माध्यमातून ७४ लाखांचा निधी

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवींनी दिलेला शब्द केला पूर्ण | सरपंच योगेश शेटये आणि सहकाऱ्यांच्या पाठपुराव्याला मोठे यश
Edited by: दिपेश परब
Published on: April 05, 2026 11:21 AM
views 320  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला तालुक्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा म्हणून ओळख असलेला केळूस- बापाडतेवाडी तारीसाणा बंधारा अखेर पक्का स्वरूपात सिमेंट कॉक्रिटचा बांधण्याचे काम मंजूर होऊन निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. या बंधाऱ्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत मृद व जलसंधारण विभागातर्फे सुमारे 74 लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

शेतकरी बागायतदार यांना उपयुक्त होणाऱ्या या बंधाऱ्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांनी दिलेला शब्द पूर्ण केला. बॅंकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध निर्णय घेत असताना शेतकऱ्यांना दिलासा देणारा बंधारा होण्यासाठी त्यांनी पुढाकार घेत हा बंधारा आता पूर्णत्वास जाणार आहे. हा बंधारा होण्यासाठी सरपंच योगेश शेटये आणि त्यांचे सहकारी यांच्या पाठपुराव्याला मोठं यश आले आहे. हा बंधारा मंजूर केल्याबद्दल पालकमंत्री नितेश राणे, विद्यमान स्थानिक आमदार दिपक केसरकर तसेच जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचे केळूस गावाच्या वतीने आभार व्यक्त करण्यात येत आहेत. तसेच गावाच्या विकासासाठी मेहनत घेणारा संवेदनशील कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे केळूस गावचे सरपंच योगेश शेटये यांच्यासह सहकाऱ्यांचेही कौतुक ग्रामस्थांकडून होत आहे. 

पुर्वीच्या काळात हा बंधारा झाडांच्या फांद्या (कवळकाटी) व मातीचा वापर करुन बंधारा बांधला जात होता. कालांतरांने अलिकडच्या 20 ते 25 वर्षात सिंमेटच्या रिकाम्या गोण्या व मातीचा वापर करुन हा कच्चा बंधारा बांधला जातो. साधारणतः 4000 सिमेंटच्या रिकाम्या गोण्या या बंधाऱ्यासाठी लागतात. या आवश्यक असणाऱ्या रिकाम्या सिंमेट गोण्या ग्रामपंचायत केळूस व ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या माध्यमातून पुरविल्या जातात, तर लोकसहभागातून शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते यांच्यामाध्यमातून 60 ते 65 हजार रूपये लोकवर्गणी गोळा करुन बंधारा बांधण्याचे नियोजन केले जात होते. या बंधाऱ्याचा उपयोग केळूस गावातील बापाडतेवाडी, देऊळवाडी, मधीलवाडी व डिमवाडी तसेच आंदुर्ले गावातील मुणगी, माईनवाडा, भगतवाडी या भागातील शेतकरी माड बागायतदार, पशुपालक यांना होतो, साधारणतः 100 हेक्टर क्षेत्रातील नारळ, सुपारी, भात, भुईमूग तसेच भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होतो.

बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूने कच्च्या शेतपाटाद्वारे बंधाऱ्यात साठवणूक केलेले पाणी शेती बागायतीला मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोटारपंप/विजेचे बिल/डिझेल आदी सर्व बाबींचा खर्च वाचविण्याचा दिलासा मिळतो. साधारणतः बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला एक किलोमिटर क्षेत्रापर्यत पाण्याचा विस्तार होत असल्याने या भागातील माडबागायती, शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या विहीरींची पाणी पातळी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे पाणीटंचाई सारख्या समस्येला सुद्धा पुर्णविराम मिळतो. तसेच बंधाऱ्याच्या मोठ्या प्रमाणात साठणाऱ्या पाण्यामुळे याभागात पाळीव जनावरांबरोबरच पशुपक्षी सुद्धा आपली तहान भागवितात. त्यामुळे निसर्गाच्या सानिध्यात असलेले विविध पक्षी याकाळात या भागात पहावयास मिळतात त्यामुळे पक्षीप्रेमींना सुध्दा ही पर्वणीच उपलब्ध होते. आता हा पक्का बंधारा मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून दरवर्षी या बंधाऱ्यावर होणारा खर्च वाचणार आहे. तसेच पाण्याच्या समस्येतून केळूस व आंदुर्ले ही दोन गावे मुक्त होतील.