
वेंगुर्ला : प्रधानमंत्री व मोदी आवास (ग्रामीण) योजने अंतर्गत मंजूर घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास वाळू पुरवठा करण्यात यावा अशी मागणी वेंगुर्ला तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायत मार्फत तहसीलदार ओंकार ओतारी यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वायंगणी सरपंच दत्ताराम उर्फ अवि दुतोंडकर यांनी तहसीलदार यांची भेट घेऊन हे निवेदन दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, ग्रामपंचायत वायंगणी हद्दीत प्रधनमंत्री व मोदी आवास (ग्रामीण) अंतर्गत ७१ घरकुल मंजूर आहेत. सदर ७१ घरकुल तात्काळ पूर्ण करण्यात यावी असे मुख्यकार्यकारी अधिकारी जि. प. सिंधुदुर्ग यांचे ग्रामपंचायतीला आदेश आहेत व त्याप्रमाणे ग्रामपंचायत याचा सतत आढावा घेत आहे. परंतु लाभार्थ्यांच्या घरकुल बांधकाम सुरु करण्याविषयी तीन वेळा सभा घेण्यात आल्या. तसेच तीन पत्रे देण्यात आली त्यावेळी लाभार्थ्याची सर्वात महत्वाची अडचण ठरत आहे ती वाळू उपलब्धी. ही बाब सर्वच लाभार्थ्यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच प्रत्येक घरकुल लाभार्थ्याला ५ ब्रास वाळू देण्याचे शासनाने शासननिर्णय क्रमांक गौखनि १०/०१२५/प्रक्र०५/ख१ दि. ३०/४/२०२५ चा शासन निर्णयाने जाहिर केलेले होते. त्याप्रमाणे वाळू उपलब्ध होत नाही तसेच खाजगी व्यवसायीकाकडे वाळू लिलाव प्रक्रिया झालेली नसल्यामुळे वाळू उपलब्ध होत नाही अशा स्थितीत लाभार्थ्याची स्थिती 'इकडे आड तिकडे विहीर' अशी झालेली आहे. त्यामुळे घरकुल बांधकामे थांबलेली आहेत. तरी लोक भावनेचा व गरीब लाभार्थ्यांचा विचार करुन वाळू उपलब्ध करुन देण्याविषयी शासन स्तरावर आपल्या मार्फत लोकमागणी कळविणेत यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष पपु परब, युवमोर्चा तालुकाध्यक्ष प्रणव वायंगणकर, सायमन आल्मेडा, ग्रामपंचायत सदस्य विनू मठकर, महेश मुणनकर, विद्या गोवेकर यांच्यासहित घरकुल लाभार्थी उपस्थित होते.










