
वेंगुर्ले : “रक्तदान हीच खरी जीवनदानाची साधना” या उदात्त भावनेतून सामाजिक बांधिलकीची परंपरा जोपासणाऱ्या वेताळ प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग – तुळस यांच्या वतीने, कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य ३३वे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.
शिबिरात एकूण ७७ जणांनी सहभाग दाखवला त्यापैकी ६२ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजसेवेचा उत्कृष्ट आदर्श घालून दिला. विशेष म्हणजे २० पेक्षा अधिक वेळा रक्तदान केलेल्या २५ दात्यांचा चषक, शाल आणि श्रीफळ देऊन कोकण कला व शिक्षण विकास संस्थेतर्फे सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे उद्घाटन भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजन करून करण्यात आले.आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले की, “रक्तदान हे केवळ सामाजिक नव्हे, तर राष्ट्रीय जबाबदारीचे कार्य आहे. वेताळ प्रतिष्ठानसारख्या संस्थांनी ग्रामीण भागात रक्तदान संस्कृती रुजवून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण ठेवले आहे. तरुण पिढीने या चळवळीत अधिक सक्रिय सहभाग घ्यावा.”
सरपंच रश्मी परब यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “तुळस ग्रामपंचायत नेहमीच सामाजिक कार्यात पुढाकार घेते. रक्तदानासारख्या उपक्रमांमुळे गावातील एकोपा, सेवाभाव आणि समाजबंध वृद्धिंगत होतो. गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आम्हाला अभिमान वाटतो.”
या प्रसंगी उपसरपंच सचिन नाईक, मकरंद पाटणकर, कोकण कला व शिक्षण विकास संस्था चे प्रथमेश सावंत, ग्रा.पं. सदस्य जयवंत तुळसकर व दादा ठुंबरे,सामाजिक कार्यकर्ते नारायण नागवेकर व सुजाता पडवळ,वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आदी मान्यवर उपस्थित होते. हे शिबिर श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस देव जैतिराश्रीत संस्था, मुंबई बहुउद्देशीय सभागृह) येथे पार पडले. सकाळपासूनच रक्तदात्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने दिसून आली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व रक्तसंकलन प्रक्रिया अत्यंत सुस्थितीत व शिस्तबद्ध पार पडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रतिष्ठान चे सचिव डॉ. सचिन परुळकर यांनी तर आभार माधव तुळसकर यांनी मानले.
शिबिर यशस्वी करण्यासाठी महेश राऊळ, सदगुरू सावंत, प्रसाद भणगे, मंगेश सावंत, रोहित गडेकर, विधी नाईक, सानिया वराडकर, सुधीर चुडजी,प्रदीप परुळकर, वैष्णवी परुळकर, भक्ती भणगे, सुधीर चुडजी, रोहन राऊळ, नाना राऊळ, यशवंत राऊळ, प्रज्वल परुळकर, अनिल परुळकर,समर्थ तुळसकर आदींनी विशेष मेहनत घेतली.