
वेंगुर्ले : वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदार संघ हा आरक्षण सोडती मध्ये सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. हा मतदार संघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे या जिल्हा परिषद मतदार संघातून विद्यमान सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी निवडणूक लढवावी अशी मागणी या भागातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून होत आहे, याबाबत आम्ही पक्षाच्या वरिष्ठांकडे मागणी करणार असल्याचे भाजप पदाधिकारी तथा खानोली विकास सोसायटी चेअरमन प्रशांत प्रभूखानोलकर आणि कार्यकर्त्यानी सांगितले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील पाच जिल्हा परिषद मतदार संघासाठी काल आरक्षण जाहीर झाले आहे. या पाच मतदारसंघापैकी आडेली जिल्हा परिषद मतदार संघ सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाला आहे. पूर्वी या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून समिधा नाईक निवडून आल्या होत्या. भाजपा पक्षाच्या माध्यमातून त्यांनी या भागात काम केले आहे. आता तब्बल अडीच ते तीन वर्षानंतर पुन्हा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आरक्षण प्रत्येक मतदारसंघाचे जाहीर झाल्याने आता उमेदवारांची चाचणी सुरू झाली आहे. वेंगुर्ले तालुक्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भाजपाची सत्ता आहे. शासनाच्या विविध योजना, अभियान आणि कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजपने गावागावात पक्षाचे जाळे विणले आहे.
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली जिल्हा परिषद मतदार संघ हा भाजप चा बालेकिल्ला आहे. त्यामुळे या मतदार संघात भाजप चा विजय हा निश्चित आहे. त्यामुळे भाजप तर्फे मनीष दळवी यांना या मतदार संघात उमेदवारी द्यावी. अशी मागणी सर्वांची आहे. मनीष दळवी हे जिल्हा बँक च्या माध्यमातून सहकारा बरोबर राजकारणातही सर्वांशी जोडले गेलेले आहेत. त्यांचा जनसंपर्कही चांगला आहे, त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा विजय निश्चित आहे, म्हणून त्यांनाच उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असल्याचे प्रशांत प्रभूखानोलकर यांनी सांगितले आहे.