वेंगुर्ल्यात चार ठिकाणी रोबोटिक वॉटर क्राफ्टचं प्रात्यक्षिक

स्थानिक सरपंच, सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थांनी घेतला सहभाग | जिल्ह्याधिकारी यांची आश्वासनपुर्ती | नागरिकांत समाधान
Edited by: दिपेश परब
Published on: October 10, 2025 19:00 PM
views 109  views

वेंगुर्ले : जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्गच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत स्वयंचलित रोबोटिकचे वॉटर क्राफ्टचे प्रशिक्षण वेंगुर्ले तालुक्यातील किनारपट्टीवरील झुलता पूल, उभादांडा-मुठ, सागरतीर्थ किनारा व शिरोडा वेळागर किनारा या भागात पूर्व रोबोटिकच जोडणी प्रात्यक्षिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सभागृहात दाखवून त्यानंतर समुद्रातील प्रात्यक्षीक समुद्र किनाऱ्यावर जाऊन VMCC INDIA SERVICES NASHIK चे तंत्रज्ञ अभिषेक कसबेकर व अजय लोहार यांनी दाखविले.

या स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्टचे वजन २२ किलो एवढे आहे. हे यंत्र १ किमी एवढ्या अंतरावरील बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवू शकते.  समुद्रात एक तास रहाण्याची क्षमता त्यात आहे.  या रोबोटच्या कुठच्याही भागात बुडणाऱ्या व्यक्तीने पकडले तरी त्यास वाचविण्यास येते.

सर्व प्रथम वेंगुर्ले नगर परिषदेच्या सभागृहात स्वयंचलित रोबोटिकचे जोडणी प नात्यक्षिक नगर परिषदेचे कर्मचारी यांच्या समक्ष करण्यात आले. त्यानंतर झुलता पूल येथे पाण्यातील प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. यावेळी स्थानिक मच्छीमार नागरिक हे पहाण्यास उपस्थित होते. या प्रात्यक्षिकांत स्थानिक लाइफगार्ड वा सागरी सुरक्षारक्षक यांनी सहभाग घेतला. कोणीही बुडताना रोबोटला कुठेही बुडणाऱ्याने पडकल्यानंतर त्याला किनारी आणला येते, असे प्रात्यक्षिकांतून दाखवून दिले. यानंतर उभादांडा, सागरतीर्थत, शिरोडा ग्रामपंचायत येथे तसेच समुद्रकिनारी प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. यावेळी तंत्रज्ञ अभिषेक कसबेकर व अजय लोहार, महाराष्ट्र सागरी मंडळाचे प्रादेशिक बंदर अधिकारी तथा रेडी बंदर निरीक्षक विश्राम उर्फ बाळू घाडी, सागरतीर्थ सरपंच शेखर कुडव, सदस्य समृद्धी कुडव, मेरी फर्नांडिस, तलाठी सतीश गावडे, ग्रामसेवक केतन जाधव, सखैलेखोल पोलीस पाटील सनी मोरजकर, टांक पोलीस पाटील केशव कुडव, सोन्सुरा पोलीस पाटील विश्वनाथ सोन्सुरकर, आरवली पोलीस पाटील मधुसुदन मेस्त्री, ग्रामस्थ नीतेश प्रभू, राजन मोंडकर, रामचंद्र तांडेल, प्रशांत बागकर, मत्स्य खात्यातील सागर सुरक्षारक्षक समीर आंगचेकर, प्रवीण मुणगेकर, संजय राणे यांचा समावेश होता. या प्रात्यक्षिकांच्यावेळी स्थानिक नगर पालिका नगराध्यक्ष किंवा मुख्याधिकारी, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, कर्मचारी पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक, सागर सुरक्षा रक्षक, संबंधित ग्रामपंचायत व नगरपालिका कर्मचारी, कोतवाल, स्थानिक शोध व बचाव गटाचे सदस्य, मच्छीमार, आपदा मित्र, अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, जलक्रीडा व्यावसायिक यांना निमंत्रीत करण्यात आलेले होते.

VMCC INDIA SERVICES NASHIK यांच्याकडून जिल्हा नियोजन समिती सिंधुदुर्गच्या नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत १३ रोबोटिक वॉटर क्राफ्ट खरेदी करण्यात आलेले आहेत. सदर रोबोटिक वॉटर क्राफ्टचा पुरवठा VMCC INDIA SERVICES NASHIK यांच्याकडून करण्यात आलेला आहे.

दरम्यान, शिरोडा-वेळागर येथे काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेवेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वेळागर भेटीत स्थानिक ग्रामस्थांनी समस्या मांडल्या होत्या. यावेळी येत्या आठ दिवसांत स्वयंचलित रोबोटिक यंत्राच्या माध्यमातून बुडणाऱ्याला वाचविण्यासाठी उपयुक्त अशा रोबोटिक यंत्राचे प्रशिक्षण देवून ते यंत्र ग्रामपंचायतीकडे दिले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. याची आश्वासनापूर्ती जिल्हाधिकारी यांनी केल्याने नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.