शिरोड्यात सत्याग्रह स्मारक होण्यासाठी ग्रामस्थांचे लाक्षणिक उपोषण

तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित
Edited by: दिपेश परब
Published on: October 03, 2025 18:28 PM
views 92  views

वेंगुर्ला : शिरोडा येथील मिठाच्या सत्याग्रह ठिकाणी भव्य सत्याग्रह स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी तसेच स्मारकाच्या कामामध्ये होत असलेल्या दिरंगाईच्या विरोधात २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती व विजयादशमीचे औचित्य साधून शिरोडा ग्रामस्थांच्या वतीने एकदिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी उपोषणस्थळी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी भेट देत या स्मारका संदर्भात आपण स्वतः लक्ष घालून याचा पाठपुरावा करेन असे आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले. तहसीलदार ओंकार ओतारी, पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते लिंबू पाणी देऊन उपोषण स्थगित करण्यात आले. 

इंग्रजांनी मीठावर लावलेल्या कराच्या विरोधात महात्मा गांधी यांनी दांडी येथे मीठाचा सत्याग्रह केला. महात्मा गांधींच्या या सत्याग्रहाला प्रतिसाद देत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील शिरोडा येथे इंग्रजांच्या जुलमी करा विरुद्ध मीठाचा सत्याग्रह करण्यात आला. या ऐतिहासिक ठिकाणी भव्य असे स्मारक उभारण्यात यावे या मागणीसाठी तसेच सत्याग्रह स्मारकाची घोषणा होऊन ३५ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटला मात्र अजूनही स्मारकाची कार्यवाही अत्यंत धीम्या गतीने सुरू असल्याच्या विरोधात शिरोडा येथील सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, इतिहासप्रेमी व ग्रामस्थांच्या वतीने हे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. 

यावेळी या उपोषणाला शिरोडा सरपंच लतिका रेडकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, तालुकाध्यक्ष विधाता सावंत, माजी सरपंच मनोज उगवेकर, माजी उपसरपंच राहुल गावडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख कौशिक परब, विभाग प्रमुख अमित गावडे, ग्रामपंचायत सदस्य रश्मी डीचोलकर, प्रथमेश परब, दिपक चोपडेकर, संदिप गावडे, जगन्नाथ डोंगरे, अभिजीत राणे, अण्णा गावडे, विराज राऊत, संदिप राऊत, नारायण गावडे, विशाल गावडे, देवेश गावडे, गोपीनाथ राऊत, तुषार राऊत, प्रवीण धानजी, अशोक परब, आजू अमरे, राकेश परब, भाऊ आंदुर्लेकर, महादेव परब तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सन २०३० साल हे ऐतिहासिक मिठाच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आहे. या पूर्वी शिरोडा गांधीनगर येथे सत्याग्रहाच्या ठिकाणी भव्य स्मारक उभारण्यात यावे. जमीन हस्तांतरणा पासून ते स्मारक उभारण्या पर्यंत सर्व प्रक्रिया जलदगतीने नियोजनबद्धरित्या पूर्ण करण्यात यावी. जमीन हस्तांतरण प्रक्रिया २६ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात यावी. १९३० साली पार पडलेल्या मिठाचा सत्याग्रह विषयीची योग्य व इत्थंभूत माहीती इतिहास प्रेमीना मिळावी या करिता शासनाने पुढाकार घेऊन सत्याग्रह अभ्यास कमिटीची स्थापना करावी. ऐतिहासिक दृष्टीने स्मारकाची उभारणी करताना येथील भागाचा पर्यटनदृष्ट्या सर्वांगीण विकास केला जावा. त्या विषयीचा आराखडा तयार करण्यात यावा. मिठागरे ही शिरोडा गावची शान आहे परंतू मिठ उत्पादन व्यवसायाला नैसर्गिक आपत्तीमुळे उतरती कळा लागली आहे. या मिठ उत्पादन व्यवसायाला शासनाने बळ देऊन उर्जितावस्था प्राप्त करून द्यावी आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. 

इर्शाद शेख यांनी तहसीलदार ओंकार ओतारी यांच्याशी मोबाईल वरून संपर्क साधून या उपोषणस्थळी शासनाचा कोणीही प्रतिनिधी आला नसल्याचे सांगीतले. त्यानंतर थोड्याच वेळात तहसीलदार ओंकार ओतारी हे वेगुर्ला पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्यासह उपोषण स्थळी दाखल झाले. या स्मारकाच्या जमीनी संदर्भात बरेचसे काम झालेले आहे. मी तुमचा प्रतिनिधी म्हणून या कामाचा पाठपुरावा करेन. नवीनच जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या तृप्ती धोडमिसे यांना या संदर्भात पहिल्यापासून पूर्ण माहीती देऊन स्मारकाची जागा शिरोडा ग्रामपंचायतीला हस्तांतरण करण्यासाठी आपण पाठपुरावा करेन असे आश्वासन यावेळी तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिले. त्यानंतर तहसीलदार ओंकार ओतारी व पोलीस निरीक्षक निसर्ग ओतारी यांच्या हस्ते लिंबू सरबत घेऊन उपोषण कर्त्यांनी उपोषण स्थगित केले.