
वेंगुर्ले : शिरोडा येथे नियोजित सत्याग्रह स्मारकाबाबतची घोषणा होऊन ३५ वर्षांहुनही अधिक काळ लोटला आहे. आजही सत्याग्रह स्मरकाबाबतची कार्यवाही अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे, किंबहुना ती थांबली आहे. या विरोधात २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंती निमित्त शिरोडा ग्रामस्थांच्या वतीने एक दिवशीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामस्थांच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
सन २०२२ मधे खूप मोठा गाजावाजा करत शिरोडा येथील मिठ सत्याग्रहाचा ठिकाणी देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी यांनी सत्याग्रह स्मारक लवकरच मार्गी लागेल यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन माध्यमांसमोर ग्रामस्थांना दिले. पण दुर्दैवाने त्या दिवसापासून स्मारकाची फाईल धुळ खात पडली आहे. शासनाला तसेच स्मारकासंदर्भात आश्वासन देणार्यां जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीना स्मारक उभारणीचा पूर्णपणे विसर पडला आहे. या सर्व संबंधितांना जाग यावी व त्यांनी स्मारकाचे जमिन हस्तांतरणाचे काम गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत याकरिता शिरोडा पंचक्रोशीतील जागरूक नागरिकांच्या वतीने गांधी जयंती दिनी २ आक्टोबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सत्याग्रह स्मारकाच्या नियोजित ठिकाणी एकदिवसीय उपोषण करण्यात येणार आहे. यासंबंधीचीचे निवेदन जिल्हाधिकारी, तहसीलदार, पोलिस ठाण्यात व शिरोडा गावचे सरपंच यांना देण्यात आले आहे.










