
वेंगुर्ले : तालुक्यातील तुळस पलतड येथील मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी यांच्या ताब्यात असलेला नादुरुस्त बंधारा जलयुक्त शिवार २.० योजनेमध्ये नवीन बांधून मिळावा तसेच वेंगुर्ला तुळस राज्य मार्ग १४८ वरील तुळस घाटी येथे धोकादायक झालेल्या पुलाला निधी मंजूर करून तो तातडीने बांधून मिळावा आदी मागण्यांसाठी १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांच्या कार्यालयासमोर तुळस ग्रामस्थांनी उपोषण केले. यावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन तात्काळ यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर पुढील निर्णय होईपर्यंत उपोषण स्थगित करण्यात आले. तसेच पुढील निर्णय न झाल्यास येत्या २६ जानेवारी ला रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
तुळस जकात नाका येथे पलतड नदीवर फार वर्षांपूर्वीचा जुना मोडकळीस आलेला बंधारा आहे. त्या बंधाऱ्याच्या पाण्यावर तुळस येथील ग्रामस्थ तसेच मातोंड, पेंडूर, होडावडा, तळवडा येथील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात शेती करतात. सुमारे ७०० हेक्टर पेक्षा जास्त क्षेत्र हे ओलीताखाली येते तसेच विहिरींच्या पाण्याची पातळी सुद्धा मे महिना अखेरपर्यंत चांगली राहते. सद्यस्थितीत त्या ठिकाणचा बंधारा हा मोडकळीस आलेला आहे. त्या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने खाडीचे पाणी असते आणि भरतीच्या वेळी ते पाणी गोड्या पाण्यात मिसळते. परिणामी शेतकऱ्यांच्या शेतीचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. सदरच्या बंधाऱ्याला जमिनी खालून तडे गेल्यामुळे सद्यस्थितीत लाकडाच्या फळ्या आणि माती असा बंधारा घातला तरी त्यात खाडीचे खारेपाणी मिसळते, त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
या संदर्भात जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग रत्नागिरी यांना बंधाऱ्यासाठी निधी मंजूर करून नवीन बांधण्यासाठी ग्रामपंचायत तुळस यांनी ग्रामसभेच्या ठरावा सहीत निवेदन दिले होते. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचे त्या वेळचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांना सुद्धा जनता दरबार मध्ये ग्रामपंचायत तुळस यांनी निवेदन दिले होते. तसेच सध्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना सुद्धा १७ मार्च रोजी निवेदन दिले होते. अद्याप पर्यंत त्या कामासंदर्भात कोणत्याही प्रकारच्या निधीची तरतूद झालेली दिसून येत नसल्याने हे आंदोलन केल्याचे ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी ग्रामस्थ नितीन लिंगोजी, सलील लिंगोजी, रामचंद्र पवार, सिद्धेश नाईक, केशव मेस्त्री, प्रवीण रेडकर, आपा परब आदी ग्रामस्थ उपस्थित होते.