
वेंगुर्ले : सावंतवाडी तुळस मार्गे वेंगुर्ला या मुख्य रस्त्यावर तुळस गावात रस्त्याच्या साईट पटटीचे काम करण्यात आलेले नाही आहे. रस्त्याला साईट पटटी नसल्यामुळे शाळेतील मुलांना येताना व जाताना रस्यावरुन चालत जावे लागते. काही दुकान व्यवसाय मालकांनी साईट पट्टीवर व गटारावर अतिक्रमण करुन पाणी रस्त्यांवर सोडले आहे. त्यामुळे चालत जाणा-या शाळकरी मुलांना व ग्रामस्थांना अपघात होण्याची शक्यता आहे.
त्याचप्रमाणे रस्त्याला असणारे गतिरोधक त्यावर पांढरे पट्टे मारलेले नाहीत. त्याचप्रमाणे जैतीर मंदिर बसस्थानकाच्या रस्त्यावर गतिरोधक घातलेले आहे. त्याची उंची जास्त असल्याने अपघात होत आहेत. सदर शाळेतील मुलांना शाळेत जाताना किंवा येताना अपघात झाल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील. तसेच वेशीवाडी ते कुंभारटेंब या दरम्यान असणारा पुल त्याला खड्डे पडले आहेत. आणि त्यामुळे तेथेही अपघात होण्याची शक्यता आहे. ज्या दुकानदारांनी अतिक्रमण केलेले आहे ते आपण हटवले नाही. तसेच अर्धवट गटारांचे काम निवेदन दिल्यापासून १५ दिवसांत पूर्ण करावे. अशी ग्रामस्थांची मागणी आहे. १५ दिवसांत काम पूर्ण न झाल्यास रस्ता रोको आंदोलन केले जाईल. त्याचप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभागांने कोणत्याही दडपणाखाली साईट पटटीचे काम अर्धवट ठेवू नये. असा इशारा तुळस येथील सामाजिक कार्यकर्ते अवधूत मराठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.










