
वेंगुर्ले : "इमान इथल्या मातीशी, माणुसकीच्या नात्याशी" अशा ब्रीदवाक्याने जनमानसात परिचित असलेल्या वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या वतीने आणि वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती व सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्या सहकार्याने उद्या रविवार, दिनांक १५ जून २०२५ रोजी सकाळी ०९.०० वाजता श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय, तुळस (तुळस श्री देव जैतीराश्रीत संस्था मुंबई बहुउद्देशीय सभागृह) येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांचे हे सलग ३०वे रक्तदान शिबिर असून रक्तपेढी ओरोस यांचे विशेष सहकार्य लाभणार आहे. रक्तदान हे कोणाच्यातरी जीवन वाचविण्याचे कार्य आहे. सद्य स्थितीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असून त्यामुळे या शिबिरात इच्छुक रक्तदात्यांनी सहभागी व्हावे आणि समाजासाठी आपली जबाबदारी पार पाडावी, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक तिरोडकर आणि वेंगुर्ला तालुका पत्रकार समिती चे अध्यक्ष दीपेश परब यांनी केले आहे.