
वेंगुर्ले : तालुक्यातील परुळे भागात मुसळधार पाऊस आणि वादळामुळे सुतारवाडी येथील कृष्णा भीवा मेस्त्री यांच्या घरावर जुने वडाचे झाड उन्मळून पडले. त्यामुळे घराचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. गेले दोन दिवस परुळे भागात मुसळधार पाऊस पडत आहे. यावेळी मेस्त्री यांच्या घराच्या बाजुला असलेले झाड मध्यरात्री उन्मळून पडले. त्यामुळे घराचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही. मेस्त्री कुटुंबावर गेल्या ८ दिवसात दोन आघात झाले आहेत. नुकतंच त्यांच्या भावाच अल्प आजाराने निधन झाले. त्यातून सावरत असताना ही नैसर्गिक आपत्ती त्यांच्यावर कोसळली आहे.
यावेळी माजी सभापती निलेश सामंत, सोसायटी व्हा. चेअरमन प्रसाद पाटकर, परुळे सरपंच प्रणिती आंबडपालकर, उपसरपंच संजय दूधवडकर, सदस्य प्रदीप प्रभू, प्राजक्ता पाटकर, सीमा सावंत, सुनाद राऊळ, पोलीस पाटील श्वेता चव्हाण तसेच सुनील चव्हाण यांनी भेट देत पाहणी केली. ग्राम महसूल अधिकारी आर आर गवते, कोतवाल स्वप्निल वरक यानी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी भाजपा परुळे च्या वतीने मेस्त्री यांना तात्काळ रोख रक्कम १० हजार रुपयांची तात्काळ मदत करण्यात आली. झाड बाजूला करण्यासाठी परुळे मधील ग्रामस्थांनी सहकार्य केले.










