
वेंगुर्ले : वेंगुर्ले शहरातील उपजिल्हा रुग्णालयातील दुराव्यवस्था व विविध समस्यांबाबत वेंगुर्ला तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे शुक्रवारी उपजिल्हा रुगणालयाच्या ठिकाणी आंदोलन करण्यात आले. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांनी उपजिल्हा रुग्णालयास कायमस्वरूपी अधिक्षक म्हणून दिलेले डॉ. संदिप सावंत यांनी वेंगुर्ले तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून येत्या ३० दिवसांत लेखी निवेदनातील सर्व मुद्दयांची पुर्तता करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले. दरम्यान दरम्यान दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लवकरात लवकर मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा पवित्रा घेण्यात येणार असल्याचे तालुका प्रमुख यशवंत परब यांनी स्पष्ट केले.
वेंगुर्ला तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयाच्या झालेल्या दुरावस्थेबाबत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांची ३१ ऑगस्ट रोजी भेट घेऊन विविध समस्यांवर लक्ष वेधले होते. तर उपजिल्हा रुग्णालया बाबत मांडलेल्या मुद्दयांची पुर्तता न झाल्यास दिनांक ८ सप्टेंबर रोजी वेंगुर्ला तालुका ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.
यानुसार ठाकरे शिवसेनेच्या वतीने आज आंदोलन सुरू करण्यात आले. दरम्यान वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाच्या विविध १७ समस्यांवर ठाकरे शिवसेनेच्या वतीने तालुका प्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, शहर प्रमुख अजित राऊळ, उपजिल्हाप्रमुख प्रकाश गडेकर, माजी नगराध्यक्ष संदेश निकम, माजी नगरसेविका सुमन निकम, माजी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, महिला आघाडी संघटक मंजुषा आरोलकर, वायंगणी माजी सरपंच सुमन कामत यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. संदिप सावंत यांचेशी चर्चा केली. यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचा डॉक्टर निवास हा रिकामी आहे तेथे कोणी रहात नाहीत. रक्ताचे रिपोर्ट हे त्याचदिवशी मिळतील. रुग्णालयासाठी असलेल्या टेक्नीकल मशिनरीसाठी तंत्रज्ञ देण्यात येईल. १०२ रुग्णवाहिकेसाठी चालक मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकीत्सकांकडे मागणी करणार असल्याचे तसेच सफाई कामगार मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. संदिप सावंत यांनी स्पष्ट केले.
यावेळी रुगणालयाच्या वैद्यकिय अधिकारी डॉ. स्वप्नाली माने पवार, अधिरीचारीका सौ. डिसोजा तसेच शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तुषार सापळे, उपतालुका प्रमुख संजय गावडे, अँङ जीजी टांककर, अल्पसंख्याक सेलचे तालुका प्रमुख रफिक बेग, वायंगणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुमन कामत, विभाग प्रमुख संदीप पेडणेकर, सुजित चमणकर, गजाननन गोलतकर, दिलीप राणे, दया खर्डे आदी उपस्थित होते.