उत्तर प्रदेशातील आरोपीला पकडण्यात वेंगुर्ले पोलिसांना यश

आरवली सोन्सुरे येथील खुनी हल्ला प्रकरण
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 09, 2022 12:36 PM
views 164  views

वेंगुर्ला: आरवली सोन्सुरे मधलीवाडी येथील विनायक आत्माराम राणे यांच्या काजूच्या बागेच्या देखभालीकरीता असलेला बिहार येथील रामतपेशा राजभर (38) याच्यावर सुरीने खुनी हल्ला करून पळून गेलेल्या दोन संशयित आरोपींपैकी एकाला उत्तर प्रदेश येथून पकडुन अटक करण्यात वेंगुर्ले पोलीस पथकाला यश आले आहे.दोन महिन्यांपूर्वी हा गुन्हा घडला होता.

    आरवली सोन्सुरे मधलीवाडी येथील विनायक राणे यांच्या बागेत राजभर हा कामाला होता. तो दिवसभर बागेत काम करून रात्री राणे यांच्या घरा शेजारी मांगरामध्ये राहत असे. तसेच तो स्वत:चे जेवण खाणे स्वःत करत असे. 11 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास रामतपेशा राजभर याचे गावाकडील नातेवाईक हरीलाल राजभर (35) व त्रिलोकी राजभर (55) हे दोघे त्याच्याकडे राहण्यासाठी आलेले होते. त्यानंतर ते रामतपेशा राजभर याच्या खोलीतच थांबलेले होते.

दुसऱ्या दिवशी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 3.45 वाजण्याच्या सुमारास राणे यांच्या घरी आले आणि रामतेपशा राजभर हा रक्ताच्या उलट्या करत आहे असे सांगितले. त्यामुळे तात्काळ रामतपेशा याला दवाखान्यात घेउन जाऊ असे सांगुन माझा भाऊ भिकाजी राणे याला रिक्षा घेउन येण्यास सांगितले तसेच त्याचे सोबत हरिलाल राजभर व त्रिलोकी राजभर हे देखिल पाठीमागुन गेले आणि मधल्या वाटेतून पळून गेले.

दरम्यान राजभर राहत असलेल्या खोलीमध्ये जाऊन राणे यानी पाहिले असता रामतपेशा राजभर याच्या गळ्यातून रक्त येत असलेले पाहिले. त्यामुळे आम्ही त्याला काय झाले असे विचारले असता त्याने आम्हाला त्याचेकडे आलेल्या हरिलाल व त्रीलोकी याने बाजुला असलेली सुरी आपल्या गळ्यावर मारून खुनी हल्ला केला असे सांगितले. त्यामुळे राणे यानी त्याला शिरोडा उपजिल्हा रूग्णालय येथे उपचारासाठी दाखल केले आणि या प्रकाराची माहिती पोलिसांना दिली. या प्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात भादवी कलम 307,326,34, नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, वेंगुर्ले पोलीस त्या दोघांचा शोध घेत होते. यादरम्यान पोलीस उपनिरीक्षक विनायक केसरकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल योगेश वेंगुर्लेकर, पोलीस नाईक योगेश राऊळ, पोलीस कॉन्स्टेबल राहुल बरगे उत्तर प्रदेश,जिल्हा देवरिया येथे जाऊन तेथील स्थानिक मईल पोलीस स्टेशन च्या मदतीने गुह्यातील प्रमुख आरोपि हरीलाल त्रिलोकी राजभर वय35, रा.देवडी पोस्ट अंडीला, तालुका बरहज, जिल्हा देवरीया याला सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतला. गुन्ह्यातील आरोपी क्रमांक 2  मदन त्रीलोकी राजभर हा सापडू शकला नाही. पण त्याचाही शोध पोलीस घेत आहोत अशी माहिती वेंगुर्ले चे पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांनी दिली.