
वेंगुर्ला : राष्ट्रीयस्तरावर स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये उत्कृष्टकामगिरी करणा-या तसेच राज्यस्तरीय माझी वसुंधरा अभियान, शहर सौंदर्यीकरण अभियान अंतर्गत सर्वोत्तम कामगिरी करणा-या वेंगुर्ला नगरपरिषदेस १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र नगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक मनोज रानडे व सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांनी सदिच्छा भेट दिली.
‘माझी वसुंधरा अभियान ३.०‘ अंतर्गत कोकण विभागात सर्वोत्तम कामगिरी केल्यामुळे वेंगुर्ला नगरपरिषदेस प्रथम क्रमांकाचे मानांकन तसेच एक कोटीचे बक्षिस प्राप्त झाले आहे. यातून शहरात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम साकारण्यात येत आहेत. त्यानुसार कंपोस्ट डेपो येथे माझी वसुंधरा अभियानाबाबत जनजागृती करण्यासाठी व पंचमहाभूतांची प्रचार प्रसिद्धी करण्यासाठी आकर्षक शिल्पाकृती उभारण्यात आली आहे. या शिल्पाकृतीचे लोकार्पण नुकते आयुक्त मनोज रानडे यांच्या हस्ते झाले. तर जवळपास २७०० देशी प्रजातीच्या रोपांची लागवड करून नव्याने विकसित करण्यात आलेल्या ‘मियावाकी वना‘चे लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. याठिकाणी वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण करून हवामान बदल मर्यादित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या बांबू, शेवगा, खस या प्रजातीच्या १५०० रोपांची तसेच बदाम, सोनचाफा, जांभुळ, पारिजातक, रातराणी, बकुळ, सप्तपर्णी अशा विविध देशी प्रजातींच्या १२०० रोपांची लागवड करण्यात आली आहे.
मान्यवरांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प, मिरॅकल पार्क, सांडपाणी, मैलापाणी व्यवस्थापन प्रकल्प आणि फुलपाखरू उद्यानाची तसेच मृत जनावरांना जाळण्यासाठी नव्याने विकसित करण्यात आलेल्या शवदाहिनी केंद्रास भेटदिली. वेंगुर्ला नगरपरिषद ही शाश्वत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासोबत परिपूर्ण अर्थव्यवस्थेच्या प्रभावी अंमलबजावणीचे उत्कृष्ट उदाहरण असल्याचे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले. तसेच येथील शुन्य कचरा मॉडेल आदर्श मानून इतर नगरपरिषदांनी या प्रकल्पाचे अनुकरण करावे असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.