
वेंगुर्ला : आकाश फिश मिल कंपनीकडून दूषित पाणी समुद्रात सोडल्याच्या काही बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर आकाश फिश मिल कंपनीकडून उत्पादन प्रक्रियेनंतर निर्माण होणारे पाणी हे अत्याधुनिक शुद्धिकरण प्रकल्पातून झालेले शुद्ध पाणीच समुद्रात सोडले जाते असे कंपनीने सांगितले आहे.
याबाबत आकाश फिश मिल कंपनी कडून देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आले की, अलीकडे आमच्या कंपनीबाबत काही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या प्रसारित झाल्या आहेत. प्रत्यक्षात, आकाश फिश मिलतर्फे कोणत्याही परिस्थितीत अशुद्ध पाणी थेट समुद्रात सोडले जात नाही. उत्पादन प्रक्रियेनंतर निर्माण होणारे पाणी हे अत्याधुनिक शुद्धिकरण प्रकल्पातून पूर्णपणे शुद्ध केल्यानंतरच समुद्रात सोडले जाते. यासाठी आमच्या कंपनीमध्ये आवश्यक त्या आधुनिक यंत्रणा बसवण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळे सागरी पर्यावरण किंवा जैवविविधतेला कोणताही धोका निर्माण होत नाही.
काही दिवसांपूर्वी समुद्री लाटांच्या तीव्रतेमुळे शुद्धिकरणानंतर पाणी सोडणारी पाइपलाईन तुटण्याची घटना घडली होती. ही बाब आमच्या निदर्शनास आल्यानंतर आम्ही तातडीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला याची माहिती दिली व आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही त्वरित पूर्ण केली. त्या क्षणीची दृश्ये काही ग्रामस्थांनी चित्रीत करून सामाजिक माध्यमांवर प्रसारित केली होती, ज्यामुळे गैरसमज निर्माण झाले. दुर्दैवाने, काही व्यक्तींनी या घटनेचा विपर्यास करून कंपनीविषयी चुकीची माहिती पसरवली आहे तसेच उपोषणासारख्या कृतींच्या धमक्या देऊन कंपनी व प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आम्हाला ठामपणे सांगावेसे वाटते की, असे प्रयत्न केवळ वैयक्तिक/आर्थिक फायद्यासाठी केले जात असून ते समाजहिताला बाधा पोहोचवणारे आहेत. आकाश फिश मिल ही समाजाभिमुख कंपनी असून पंचक्रोशीतील विकासकामांसाठी कंपनीकडून CSR फंडद्वारे सातत्यपूर्ण योगदान दिले जाते. स्थानिक विकास आणि सामाजिक प्रगती हाच आमच्या उपक्रमांचा मुख्य उद्देश आहे. कंपनी आपल्या सर्व कामकाजामध्ये पर्यावरणीय नियमांचे काटेकोर पालन करत आहे व भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये यासाठी कंपनी कडून अधिक कडक उपाययोजना केल्या जातील असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे.










