
वेंगुर्ला : समुद्रकिनाऱ्यावरील होणाऱ्या अवैद्य वाळू उपसाबाबत वेंगुर्ला तालुक्यातील आरवली टांक येथे अज्ञातांकडून बॅनर लावून प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले आहे. "आमचा समुद्रकिनारा वाचवा, अवैद्य वाळूउपसा थांबवा" अशी मागणी या बॅनर द्वारे करण्यात आली आहे. समुद्रकिनाऱ्यावरील वाळूची बैलगाड्यांनी तस्करी केली जात असल्याचे या बॅनर वरून अधोरेखित करण्यात आले आहे. तर प्रजननासाठी समुद्र किनाऱ्यावर येणाऱ्या ऑलिव्ह रिडले कासव वाचवाची मागणीही या बॅनर द्वारे करण्यात आली आहे.
तर एका बाजूला हातात पैशांची बॅग घेतला सूट मधील व्यावसायिक पारंपरिक मच्छिमार व स्थानिक मच्छिमार यांना "समुद्र तुमच्या बापाचा नाही" असे सांगत असल्याचे चित्र बॅनर वर दाखवण्यात आले आहे. दरम्यान या बॅनर मूळे वेंगुर्ल्यातील काही समुद्र किनाऱ्यावर अवैद्य वाळू उपसा होत असल्याचे अधोरेखित झाले आहे. याबाबत प्रशासनाने ठोस पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.










