
उभादांडा : उभादांडा ग्रामपंचायत व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या संयुक्त विद्यमाने ८ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेल्या आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गरोदर माता तसेच किशोरवयीन मुलींसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमात आरोग्य तपासणीसोबतच जागृतीपर मार्गदर्शन करण्यात आले. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. गायत्री पालयेकर यांनी गरोदर मातांची आरोग्य तपासणी करून गर्भधारणेदरम्यान घ्यावयाची विशेष काळजी, संतुलित आहार, आवश्यक लसीकरण व कुटुंब नियोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. अशा उपक्रमांमुळे माता-बाल आरोग्य सुरक्षित राहून मृत्यूदर कमी होण्यास मदत होते, असेही त्यांनी नमूद केले.
न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा येथे आठवी ते दहावीतील ५९ विद्यार्थिनींना मासिक पाळी व्यवस्थापन, स्वच्छतेचे नियम, पौष्टिक आहाराचे महत्त्व तसेच मोबाईलच्या अतिरेकामुळे होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन देण्यात आले. किशोरवयात मिळणारे असे मार्गदर्शन आरोग्य समस्यांपासून बचाव, आत्मविश्वास वृद्धी आणि शाळाबाह्य होण्याचे प्रमाण कमी करण्यास सहाय्यक ठरते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री. भिसे, आरोग्य कर्मचारी श्रीमती ईदालीन फर्नांडीस, आशा स्वयंसेविका, तसेच डॉ. विभा नाईक यांनी सहकार्य केले. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या समन्वयक सौ. स्वाती मांजरेकर यांनी केले.










