
वेंगुर्ला : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत, येथील ग्रामपंचायत अणसूर येथे सिंधू रक्त मित्र प्रतिष्ठान आणि ग्रामपंचायत अणसूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. गावातील ३० रक्तदात्यांनी या शिबिरात रक्तदान केले.
या शिबिराचे उदघाटन सरपंच सत्यविजय गावडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महराज्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व श्री सातेरी देवस्थान कमिटीचे अध्यक्ष चंद्रकांत गावडे, उपसरपंच वैभवी मालवणकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी सदस्य सीमा गावडे, सुधाकर गावडे, प्रज्ञा गावडे, साक्षी गावडे, ग्रामपंचायत अधिकारी सायली सातोसे, तसेच सुनिल गावडे, मंगेश गावडे, प्रभाकर गावडे, नितीन अणसुरकर, कर्मचारी सोनू गावडे, संजय पिळणकर आणि रामचंद्र गावडे आदी उपस्थित होते.
संकलनाचे संपूर्ण नियोजन एस एस पी एम ब्लड बँक, सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले होते. ब्लड बँकचे इन्चार्ज श्री. यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि सुरळीतपणे शिबिराचे व्यवस्थापन केले, ज्यामुळे रक्तदात्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ग्रामपंचायत अणसूरने घेतलेला हा पुढाकार मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या उद्देशाला साजेसा असून, या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि आरोग्य सेवा जपण्याचा संदेश देण्यात आला. रक्तदात्यांचा प्रशस्तीपत्रक व सुपारीचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.










