
वेंगुर्ला : वेंगुर्ला तालुक्यातील आरवली वेतोबा मंदिर येथे पुलाचे बांधकाम करण्याचे काम सुरू असून पुलाच्या बाजुने पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र २० मे पासून अवकाळी पावसाने थैमान घातल्याने पर्यायी मार्ग बंद झाला आहे. या मार्गावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान या मार्गाची तहसीलदार यांनी पाहणी करून पर्यायी मार्गाने वाहतूक करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, तहसीलदार ओंकार ओतारी यांनी आरवली वेतोबा मंदिर नजीकच्या पुलाची पाहणी केली. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर दाभोलकर, एसटी आगार प्रमुख कुंभार, पोलीस कॉन्स्टेबल बंटी सावंत, आरवली माजी सरपंच मयूर आरोलकर संजय आरोलकर, कृष्णा येसजी आदी उपस्थित होते. यावेळी दुचाकी व चारचाकी तसेच अन्य हलक्या वाहनांनी वेंगुर्ला वरून शिरोडा येथे जाताना टाक मारुती मंदिर, आसोली, सोन्सुरे मार्गे आरवली शिरोडा अशी वाहतूक करावी. तर अवजड वाहनांनी वेंगुर्ला, तळवडे, मळगाव, रेल्वे स्टेशन मार्गे शिरोडा अशी करावी. तसेच शिरोडा वरून वेंगुर्ला येथे जाताना दुचाकी व चारचाकी व चारचाकी तसेच अन्य हलक्या वाहनांनी शिरोडा वेळागर ते सागरतीर्थ ग्रामपंचायत कडून टाक मार्गे वेंगुर्ला अशी वाहतूक करावी तर अवजड वाहनांनी शिरोडा, मळेवाड, रेल्वे स्टेशन, तळवडे मार्गे वेंगुर्ला अशी वाहतुक करण्याच्या सूचना वेंगुर्ला तहसीलदार ओंकार ओतारी यांनी दिल्या आहेत.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग वेंगुर्ला यांनी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला रस्ता व पर्यायी वाहतूक मार्ग लोकांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी दिशादर्शक फलक, वाहतूक चिन्हे लोकांना समजेल अशा भाषेत लावण्याच्या सूचनाही तहसीलदार यांनी केल्या आहेत. तसेच पोलीस निरीक्षक यांनी वाहतूक वळवण्यात आलेल्या ठिकाणी आवश्यक पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचनाही तहसीलदार यांनी केल्या आहेत.